आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून महिना संपत आला तरी पाऊस न पडण्याची स्थिती १९७२ नंतर प्रथमच; शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - जून महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे तर कूपनलिकाही कोरड्या ठाक झाल्या आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अशी परिस्थिती निर्माण होण्याची १९७२ च्या दुष्काळानंतरची ही पहिलीच स्थिती असल्याचे जाणकारांचे मत असून पावसाने आणखी सुट्टी घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


दरवर्षी साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस होत असतो. हा पाऊस कमीअधिक प्रमाणात असला तरी या पावसामुळे विशेषतः पाळीव आणि वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते; त्याचबरोबर वातावरणात थंडावा निर्माण होतो. या पावसाची मदत जलस्त्रोतांमधील पाणी पातळी वाढण्यासाठी  होत असते. मे महिन्यात जास्त अवकाळी पाऊस झाला नाही तर साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हमखास पाऊस होत असतोच. गेल्या २५ वर्षांमध्ये ही स्थिती कायम आहे. परंतु यावर्षी मात्र संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले आहेच; शिवाय जून महिना संपण्याच्या स्थितीत असतानाही पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्या सारखेच वाढलेले तापमान,  रखरखते भूपृष्ठ, पाने गळालेली झाडे आणि बरगड्या दिसत असलेले प्राणी ही स्थिती चक्क पावसाळ्याचा महिन्यात निर्माण झाली आहे. 

 

२५ वर्षांनंतर प्रथमच कोरड
जाणकारांच्या मतानुसार गेल्या २५ वर्षानंतरच नव्हे तर १९७२ च्या दुष्काळानंतर जून महिना संपत आला तरी पाऊस न पडण्याची हिंगोली जिल्ह्यात परिस्थिती याच वर्षी निर्माण झाली आहे. १९७२ मध्ये  लोकसंख्या कमी असली तरी त्यांना खायला अन्न मिळत नव्हते आणि पाणी पुरसे होते. तर आज मात्र  गोदामांमध्ये खाद्यान्न आहे. परंतु पिण्याचे पाणी नाही. 

 

वन्यजीवही धोक्यात
अनेक वनक्षेत्रात वन्य प्राण्यासाठी जंगलात पाणीच उरले नाही. पाण्यावाचून ते तडफडून मरत आहेत. तर या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे  गणित बिघडण्याच्या मार्गावर असून आणखी पावसाने अशीच सुट्टी घेतली तर खरिपाचे पीक हाती लागते की नाही अशी भीतीही वाटत आहे. 

 

बिनापावसाचे मे-जून महिने पहिल्यांदाच
१९७२ मध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये माणसांचे खूप हाल झाले होते. माझा जन्म १९३० सालाचा असून त्यानंतर आतापर्यंत मी १९७२ नंतर हा पहिलाच पावसाळ्याचा महिना पाहत आहे, ज्यामध्ये मे संपला आणि जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही.
- नर्मदाबाई भिसे, ज्येष्ठ नागरिक, सिद्धार्थ नगर हिंगोली.

बातम्या आणखी आहेत...