आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९५ गरीब मुलींच्या शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी १५ शिक्षक करतात दरमहिना ५० हजारांची मदत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेतील शिक्षकांचे योगदान
  • उस्मानाबादेतील जि.प. शाळेचा प्रत्येक शिक्षक दरमहिना पगारातून देतो ३ ते ४ हजार रुपये

चंद्रसेन देशमुख 

उस्मानाबाद - ८८ वर्षांपूर्वीची जिल्हा परिषदेची मराठी कन्या शाळा. उस्मानाबाद शहरातील सर्वात जुनी आणि नामांकित. मात्र, तिची ओळख आता गरिबांच्या मुलींची शाळा म्हणून झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेले आई-वडील त्यांच्या मुलींना या शाळेत प्रवेश देतात. मुलींच्या शिक्षणासाठी, प्रवासासाठी खर्च करणे त्यांच्यासाठी अडचणीचे. परिणामी अनेक कुटुंबांतील मुलींचे शिक्षण अर्ध्यावरच सुटत चाललेले. त्यामुळे मुलींच्या प्रवासासाठी शिक्षकांनीच पगारातून पैसे देण्याचा निश्चय केला आणि पाहता पाहता ही रक्कम महिन्याला ५० हजारांवर गेली. शाळेतील १५ शिक्षक ९५ गरीब मुलींच्या प्रवासासाठी महिन्याला न चुकता सुमारे ४८ ते ५० हजार रुपये खर्च करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून सावित्रीच्या लेकींसाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. त्यातून त्यांच्या मनाची श्रीमंती अधोरेखित होते.उस्मानाबादेत सध्या सर्वांत दुर्लक्षित असलेल्या मात्र एकेकाळी प्रवेशासाठी चढाओढ असलेल्या जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेचा उल्लेख केवळ मैदानासाठी केला जातो. मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या या शाळेत सध्या ३६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुलींची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, इथे शिकणाऱ्या मुली अत्यंत गरीब कुटुंबातल्या आहेत. कुणाचे आई-वडील मोलमजुरी करणारे, कुणाचे आई-वडील जग सोडून गेलेले. कुणी नातेवाइकांच्या मदतीने, तर कुणी स्वत: कष्टाची कामे करून शिक्षण घेत उद्याच्या उज्ज्वल भविष्यकाळाचा शोध घेत आहेत. अडचणीवर मात करताना अनेक जणींना शिक्षणावर पाणी सोडावे लागते. पण, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विचारांची श्रीमंती असलेले शिक्षक प्रयत्न करीत आहेत. 

गरिबांच्या मुलींना मदत करण्याच्या भावनेतून स्वत:च्या पगारातून महिन्याला साडेतीन ते चार हजार रुपये गोळा करून मुलींच्या प्रवासासाठी ऑटोरिक्षा, स्कूल बसचा खर्च १५ शिक्षक करतात. २००५ पासून हा उपक्रम शिक्षकांनी अविरतपणे सुरू ठेवला आहे.शाळेतील ९५ मुलींची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने व त्यांना शाळेपर्यंतचा प्रवास करणे अडचणीचे असल्याने शिक्षकांनी अशा मुलींसाठी स्वत: खर्च करण्याचा निर्णय घेतला. ख्वाजानगर, साठेनगर, सांजा चौक, गोरोबा काकानगर आदी भागांतून ६ ऑटोरिक्षा, २ खासगी स्कूल बसमधून मुली शाळेला येतात. २ शिफ्टमध्ये येणाऱ्या या मुलींच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च शिक्षक करतात. मदतीमुळे शाळेतील गळतीचे प्रमाण काहीअंशी कमी झाल्याचे पर्यवेक्षक बशीर तांबोळी यांनी सांगितले.शाळेची परवड

मराठी कन्या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर आहेत. सध्या शहरात खासगी शाळांमध्ये प्रचंड स्पर्धा असताना मराठी कन्या शाळेकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माजी विद्यार्थ्यांचेही दुर्लक्ष झाले आहे. खासगी शाळांमध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे डोईजड होत आहे. त्यामुळे झेडपीच्या अशा शाळा गरिबांसाठी आधार अाहेत. शाळेच्या मालकीची भव्य इमारत आहे. मात्र, दुरुस्तीअभावी, सुविधेअभावी परवड सुरू आहे. केवळ मैदानापुरता शाळेचा वापर केला जात असल्याने उलट विद्यार्थ्यांचे अधिकच शैक्षणिक नुकसान होत आहे.मुलींना आधार मिळाला


बहुतांश मुली परिस्थितीअभावी शिक्षण सोडून देत होत्या. शिक्षण सुटताच १० वीतच पालकांकडून विवाह लावण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, आम्ही सर्व शिक्षकांनी मुलींच्या शिक्षणासाठी दर महिन्याला पगारातून रक्कम देण्याचा निर्णय घेतला. ५ ते ७ किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या मुलींच्या प्रवासाचा खर्च आम्ही देत आहोत.
- डॉ. तबस्सुम सय्यद, मुख्याध्यापिका, 
मराठी कन्या शाळा.