आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल मानधनासाठी परदेशी क्रिकेटपटूंचे ‘विमा कवच’; इंग्लंड, विंडीज, दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू आघाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - जगातील कोणत्याही खेळात खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना दर सामन्यासाठी मिळणारी बिदागी सर्वाधिक आहे. जागतिक मानधन संशोधन करणाऱ्या संस्थेच्या अहवालात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीजच्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. आपल्याला ५० ते ६० दिवसांच्या खेळासाठीचे प्रचंड मानधन देशासाठी खेळताना झालेल्या दुखापतीमुळे वाया जाऊ नये यासाठी बहुतेक परदेशी क्रिकेटपटूंनी स्वत:चा ‘विमा’ उतरवला आहे. एवढेच नव्हे, तर आयपीएल स्पर्धेत उतरणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी विविध पॉलिसी काढणाऱ्या कंपन्यांची यंदा वाढ झाली आहे.

 


 याचे प्रमुख कारण म्हणजे आताचे क्रिकेटपटू हुशार (स्मार्ट) झाले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत तुम्ही फक्त ‘फिट’ राहिलात तरीही तुम्हाला निम्मे मानधन मिळते. मात्र, स्पर्धेआधी दुखापत झाली तर सर्वच मानधनावर पाणी सोडावे लागते. केवळ न खेळताही आयपीएल कालावधीत कोट्यवधींचे मानधन क्रिकेटपटूंना मिळते. 

 


 आयपीएलमध्ये मिळणारी बिदागी सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना त्यांच्या देशासाठी खेळण्याच्या मानधनापोटी मिळणाऱ्या रकमेच्या अनेक पट आहे. मात्र, देशासाठी कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळताना दुखापत होऊन आयपीएल स्पर्धा हुकली तर होणारे नुकसान वर्षभरातील कमाईपेक्षाही अधिक आहे. 
 म्हणून ‘स्मार्ट’ क्रिकेटपटूंनी आपल्याला होणाऱ्या संभाव्य दुखापतींचा विमा उतरवला आहे. गुडघ्याची दुखापत, पाठीचे दुखणे, हाताला, बोटांना होणारी दुखापत यांचा विमा उतरवण्यात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीजचे क्रिकेटपटू आघाडीवर आहेत. 

 


 इंग्लंडचा माजी कप्तान मायकल वॉन म्हणतो, सध्या आयपीएल ही क्रिकेटपटूंसाठी पैशाची खाण आहे. ज्या खेळाडूच्या हाताला ती लागली तो त्यावरचा हक्क निश्चितच जाऊ देणार नाही. फक्त लिलावादरम्यान निश्चित झालेल्या रकमेपलीकडेही मिळकत आहे. उत्तम खेळ करणाऱ्या क्रिकेटपटूंना जाहिरातीही प्रचंड मिळत आहेत. जी कमाईही त्यांनी कारकीर्दीत मिळवलेल्या पैशांपेक्षा मोठी आहे. या संधी हुकल्या तर आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या परदेशी क्रिकेटपटू आयपीएल करारापाठोपाठ विमाही उतरवून घेत आहेत. 

 

 

मानधनात आयपीएल जगात अव्वल 
एका सामन्यात खेळण्यासाठी मिळणाऱ्या मानधनात आयपीएल जगात अव्वल आहे. एनएफएलच्या एका सामन्याची बिदागी आहे १ लाख ३८ हजार ३५४ पौंड, प्रीमियर लीगचे सामन्याचे सरासरी मानधन आहे ७८ हजार ७०३ पौंड आणि आयपीएलच्या एका सामन्यात खेळण्यासाठी दिले जाणारे सरासरी मानधन आहे २ लाख ७४ हजार ६२४ पौंड्स.