आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतभेद विसरून विदर्भाच्या विकासासाठी तरी एकत्र या!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुल पेठकर 

२०१९ या वर्षाला निरोप देऊन आता आठवडा उलटला आहे. जाता जाता ते वर्ष विदर्भासाठी काही देऊन अन् काही परत घेऊन गेले. पश्चिम महाराष्ट्राचे नेते विकासाच्या बाबतीत मतभेद विसरून एकत्र येतात. त्यांचा आदर्श वैदर्भीय नेत्यांनी घ्यायला हरकत नाही. एकमेकांवर दुगाण्या झाडण्यापेक्षा विकासासाठी एकत्र येणे केव्हाही चांगले...

कॅलेंडरच्या बदलत्या पानांसोबत वर्ष बदलतात. २०१९ या वर्षाचा शेवट कंकणाकृती सूर्यग्रहणाने झाला. राजकारणातही असेच झाले. 'मी पुन्हा येणार' असे सांगून राज्यात झंझावाती प्रचार करणारे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, असे वाटत असतानाच या सरकारला ग्रहण लागले आणि पाहता पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाले. डिसेंबर २०१९ मध्ये बोरिवली येथील प्राणिसंग्रहालयात नागपूर येथील 'सुलतान' वाघ पाठवण्यात आला. मुंबईला 'सुलतान' मिळाला. पण, विदर्भाने मुख्यमंत्रिपद गमावले…बेरका होता दिलासा मानभावी धीर होता!

पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता

मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी,

ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता

असा अनुभव देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांमुळे आला. तरी, फडणवीस मात्र 'मी येणारा मुख्यमंत्री' या भूमिकेतून अजूनही बाहेर आलेले नाहीत. २०२० मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात िवदर्भाच्या वाट्याला आठ मंत्री आले. ऊर्जा, गृह, पशुसंवर्धन, महिला व बालविकास आदी खाती विदर्भात आली. पण, नाराजी कायम आहे. नितीन राऊत यांना देण्यात आलेले बांधकाम खाते अशोक चव्हाणांना देण्यात आले, तर काँग्रेसचा विदर्भातील आक्रमक चेहरा असलेले विजय वडेट्टीवार हे त्यांना त्यांच्या लेखी मिळालेल्या फुटकळ खात्यांमुळे अजूनही नाराज आहेत. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या 'लक्ष्मीदर्शना'च्या वक्तव्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत. एकंदरीत विदर्भात चांगली खाती आहेत. त्याचा उपयोग करून विदर्भाचा विकास करता येऊ शकतो. पण, त्याऐवजी वैदर्भीय नेते एकमेकांवर दुगाण्या झाडण्यात मग्न आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे नेते विकासाच्या बाबतीत मतभेद विसरून एकत्र येतात. त्यांचा आदर्श वैदर्भीय नेत्यांनी घ्यायला हरकत नाही...

विदर्भात बऱ्याच घडामोडी घडल्या. मोदींसमोर मान वर करून बोलण्याची कुणाची हिंमत नसताना भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी थेट त्यांच्यावरच निशाणा साधून खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा हात हातात घेतला. त्यानंतर पटोले यांनी थेट नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. नागपुरात कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी चार लाख मते घेतली होती. त्यामुळे पटोले हारूनही 'बाजीगर' ठरले. त्यानंतर ते आपल्या भंडारा जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. आता त्यांच्या रूपाने विदर्भाला विधानसभेचा अध्यक्ष मिळाला आहे. भाजपतील ओबीसी नेतृत्व आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्षाने कापलेले तिकीट हा २०१९ मध्ये खूपच अनपेक्षित धक्का होता. 'बावनकुळेंचे तिकीट का कापले?' हा अजूनही 'मारुती कांबळेचे काय झाले?' या प्रश्नाइतकाच अनुत्तरित प्रश्न आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि बावनकुळे आदी अनेक बहुजन नेत्यांची तिकिटे कापली गेली. त्याचा फटका या पक्षाला निवडणुकीत बसला. खडसे अजूनही उसळी मारतात...

एकेकाळी नागपूर सर्वांत सुरक्षित समजले जात होते. पण, अलीकडे तसे राहिलेले नाही. एकाच दिवसात तीन खून झाले. त्यामुळे नव्या गृहमंत्र्यांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान आहे. अलीकडे थेट वाघ आणि बिबट्यांसारखे वन्य प्राणी नागपुरात प्रवेश करीत आहेत. मिहान औद्योगिक वसाहतीत इन्फोसिससारख्या कंपनीच्या परिसरात वाघाचा मुक्काम होता. या घटनेने कामगारांमध्ये भीती पसरली. नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्या मुक्कामाला होता. त्यामुळे आठवडाभर उद्यान बंद ठेवावे लागले. वन्यप्राण्यांच्या अधिवासावर आपण अतिक्रमण केल्याने ते शहरात यायला लागले. पूर्व विदर्भात वन्यप्राण्यांचे शहरात आणि घरात घुसणे नेहमीचे होऊन बसले आहे. त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. नव्या वर्षात त्यावर तोडगा निघेल, अशी आशा करायला हरकत नाही.

२०१९ हे वर्ष महिला आणि मुलांवर झालेल्या अत्याचारांनीही गाजले. नागपूरजवळील कळमेश्वर तालुक्यात चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने समाजमन सुन्न झाले. गोंदिया जिल्ह्यात सुटीवरून घरी परतणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बसस्थानकावर अॅसिड हल्ला झाला. मानवी मनाचा तळ ढवळून काढणाऱ्या अशा घटनांनी समाजात किती विषारीपणा भरलेला आहे, हे दाखवून दिले.

अभिमान वाटावी अशी गोष्ट म्हणजे नागपूरचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती शरद बोबडे देशाचे सरन्यायाधीश झाले. यामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. संस्कृत विद्यापीठातील प्राध्यापक मधुसूदन पेन्ना यांना संस्कृत भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. गुलाबराव महाराज यांच्यावरील 'प्रज्ञाचक्षू' ग्रंथाचे त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केले आहे.

देशभरात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरू असताना नागपूर हे त्यांना सुरक्षित शहर वाटावे, यासाठी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी 'ड्रॉप आऊट' मोहीम सुरू केली. रात्री-अपरात्री कुठेही एकट्या असलेल्या महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करताच महिला शिपाई तिला घरी सोडून देतात. या उपक्रमाचा लाभ महिलांना झाला. एकंदरीत २०१९ अस्थैर्याचे, मंदीचे, कोलाहलाचे गेले. नवे वर्ष स्थैर्यासोबतच सुख, शांती आणि समाधानाचे जावो, ही कामना! वर्षाच्या शेवटच्या दिवशीही पावसाने नागपूरला झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आगामी वर्ष शेतकऱ्यांना सुखा-समाधानाचे जावे, हीच सदिच्छा.

atul.pethkar@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...