आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिलेच अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंना सर्व माफ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाला १०० पैकी १५ गुण: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • गरज भासल्यास विशेष अधिवेशन, अन्यथा जीआर काढू- मुख्यमंत्री

मुंबई - हे कदाचित पहिले अधिवेशन असेल, ज्यात मुख्यमंत्र्यांनी एकाही चर्चेला उत्तर दिले नाही. सभागृहातही जास्त वेळ उपस्थित नव्हते. त्यांनी काही निवेदने केली. परंतु त्यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांना सगळे माफ आहे. पुढील अधिवेशनात मात्र त्यांनी जास्त वेळ सभागृहात उपस्थित राहावे आणि चर्चांना उत्तर द्यावे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच या अधिवेशनाला १०० पैकी १५ गुण देत असल्याचेही त्यांनी सांगितले.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते. या मुस्लिम आरक्षणासंदर्भात दुटप्पी भूमिका दोन्ही पक्ष घेत आहेत. ही अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल आहे. मंत्र्यांमध्ये प्रचंड विसंवाद असून एक मंत्री एक घोषणा करतात आणि दुसरे मंत्री ते नाकारतात. हे समन्वय नसलेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारने १०० दिवस पूर्ण झाले त्यानिमित्ताने एक पु्स्तिका काढली, परंतु त्यात असलेल्या १०० निर्णयांपैकी २६ निर्णय आमचेच आहेत. नागरिकत्व कायद्यावरील चर्चा सरकार टाळणार आहे, हे माहिती असल्यानेच मागण्यांवर बोलताना या विषयावर गनिमी काव्याने बोलावे लागले. , असेही ते म्हणाले.गरज भासल्यास विशेष अधिवेशन, अन्यथा जीआर काढू- मुख्यमंत्री 


महिलांच्या प्रश्नावर एक पूर्ण दिवस विधिमंडळात चर्चा घेण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी या अधिवेशनातच कायदा आणला जाणार होता परंतु कोरोनामुळे अधिवेशन लवकर संपवण्यात आले त्यामुळे कायदा आणू शकलो नाही. मात्र यासाठी आवश्यकता भासल्यास विशेष अधिवेशन घेऊ किंवा शासनादेश जारी केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे अधिवेशन लवकर आवरते घ्यावे लागले.  आमच्या सरकारने अनेक चांगले आणि महत्वाचे निर्णय अधिवेशनात घेतले. यात महाराष्ट्र राज्याचा हीरक महोत्सव साजरा होत असताना सर्व शाळांमध्ये आपली मातृभाषा असलेली मराठी भाषा शिकवणे सक्तीचे केले, औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव नाना शंकरशेट करण्याचा निर्णय घेतला असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षाने  केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले, अर्थसंकल्पात त्यांचे निर्णय घेतले असा त्यांचा आरोप असेल तर खरे तर त्यांनी त्याचे स्वागत केले पाहिजे असा टोला विरोधी पक्षाला मारुन  अर्थमंत्र्यांनी अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्प मांडला मात्र विरोधी पक्षनेत्याचे भाषण सोप्या भाषेत नव्हते, अशी टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...