औरंगाबादचे माजी एसीपी रियाझ देशमुख साध्वी प्रज्ञाविराेधात अपक्ष म्हणून रिंगणात; यामुळे घेतला निर्णय

दिव्य मराठी

Apr 26,2019 08:57:00 AM IST

औरंगाबाद - औरंगाबादेत स्थायिक झालेले निवृत्त सहायक पोलिस आयुक्त रियाझ देशमुख यांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरविरुद्ध ते निवडणूक लढवत आहेत. देशमुख यांनी शहीद एसटीएसप्रमुख हेमंत करकरेंसोबत काम केलेले आहे.


‘दिव्य मराठी’शी बाेलताना रियाझ देशमुख म्हणाले, ‘१९८८ मध्ये मी अकोला येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना हेमंत करकरे माझे वरिष्ठ होते. ते माझ्या पित्यासमान होते. पोलिसांवर काेणीही चिखलफेक नितीमत्तेला धरून नाही. मात्र मालेगाव बाॅम्बस्फाेटातील अाराेपी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेले वक्तव्य ऐकून मला अतिशय वाईट वाटले.

दुसरा मुद्दा असा की, एकीकडे पंतप्रधान शहिदांच्या नावावर मतदान मागतात. दुसरीकडे प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे समर्थन करतात. मला हा दुटप्पीपणा उघड करायचा आहे. म्हणून मी साध्वीविराेधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचाराचे नेमके काय मुद्दे असतील, माझी रणनिती नेमकी कशी असेल हे दोन-तीन दिवसांत जाहीर करणार आहे.’

शहीद करकरेंसाेबत केले अकाेल्यात काम
अमरावतीत गुन्हे शाखेचे प्रमुख असताना देशमुख २०१६ मध्ये निवृत्त झाले. नंतर औरंगाबादेत स्थायिक झाले. यानंतर त्यांनी वेब पोर्टलही सुरू केले. त्यांनी पोलिस खात्यात तीन दशकांहून अधिक काळ सेवा केली आहे. १९९८ मध्ये हेमंत करकरे अकोल्याचे एस.पी. असताना देशमुख यांनी त्यांच्यासोबतही काम केले होते.

X