आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडे महत्त्वाची जबाबदारीॽ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक एकबोटे 

नांदेड - राज्यातील सत्तेच्या बदलत्या समीकरणामुळे सध्या स्थानिक काँग्रेस गोटात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात आता काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे अाहेत. नव्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आघाडीचे सरकार येणार नाही असा दावा सर्व जण करीत होते. निवडणुकीनंतरही जनतेने महायुतीला कौल दिल्याचे स्पष्ट झाल्याने आघाडी सरकार येण्याची शक्यताही नव्हती. परंतु निकालानंतर राजकीय वर्तुळात नाट्यमय घटनांची मालिका सुरू झाली. त्याची परिणती आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेवर येण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी हा सुखद धक्का आहे. त्यातही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते तर या घटनांमुळे सुखावून गेले आहेत. आठ वर्षे विरोधी बाकावर बसलेल्या अशोक चव्हाणांसाठी महाशिवआघाडीत नामी संधी 
अशोक चव्हाणांनी २००८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवून दिले. तेव्हाही त्यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. परंतु अचानक आदर्श प्रकरण समोर आले आणि त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. तेव्हापासून ते मंत्रिपदापासून दूरच होते. २०१४ च्या निवडणुकीत ते खासदार झाले. परंतु त्याचवेळी केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आले. त्यामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. त्यानंतर राज्यातही भाजप-सेना महायुतीचे सरकार आल्याने राज्यात त्यांना विरोधक म्हणूनच काम करावे लागले. सत्तेच्या पदापासून ते दूरच राहिले. सात-आठ वर्षांनंतर त्यांना आता पुन्हा मंत्रिपदाची संधी आली आहे. नव्या सरकारमध्ये काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद पाच वर्षे राहणार, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांची या पदावर वर्णी लागणार, अशी काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांचा यापूर्वीचा मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाचा अनुभव पाहता त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी राहणार आहे, हेही निश्चित आहे. तब्बल सात-आठ वर्षांच्या कालावधीनंतर चव्हाणांना सत्तेचा सोपान चढण्याची संधी राज्यातील नव्या समीकरणामुळे मिळणार आहे. त्याचा काँग्रेस गोटात आनंद व्यक्त केला जातो. 
 

सरकार निश्चित येणार 


काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमर राजूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार निश्चित स्थापन होणार आहे. याबाबत काँग्रेस श्रेष्ठींनीही अनुकूलता दर्शवली आहे. अशोक चव्हाण हेच नव्या सरकारच्या स्थापनेच्या वाटाघाटी करीत असल्याने त्यांना महत्वाची जबाबदारी मिळणार हे निश्चित आहे. काँग्रेससाठी ही अत्यानंदाची बाब आहे, असेही राजूरकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...