Politics / माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ गनिमी काव्याने आज बांधणार शिवबंधन? 

उत्तर महाराष्ट्रात भुजबळ यांचा अाेबीसी फॅक्टर शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरणार

Sep 01,2019 12:19:12 PM IST

नाशिक - राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या घरवापसीबाबत राेज नवीन तारीख एेकायला मिळत असताना रविवारी दुपारी साडेबारा वाजता गनिमी काव्याने ते शिवबंधन बांधणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे रविवारी नाशिकमध्येच मुक्कामासाठी नियाेजन असताना शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांनी अचानक माझगाव या मुंबईतील निवासस्थानाकडे कूच केल्यामुळे चर्चेला बळ मिळाले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विराेध तसेच नानाविध आराेपांचे शुक्लकाष्ठ कायम असतानाही माताेश्रीवर प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे हाेणारी संभाव्य टीका लक्षात घेत गुपचूप पक्ष प्रवेश साेहळा उरकण्याचा प्रयत्न असल्याचे बाेलले जाते.


लाेकसभा निवडणुकीनंतर बदलती राजकीय समीकरणे, ईडीसह नानाविध अाराेपांच्या अनुषंगाने चाैकशीचा ससेमिरा यामुळे बेजार भुजबळ यांनी सेफ झाेनमध्ये जाण्याचा पवित्रा घेतल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे अाहे. त्याचाच भाग म्हणून शरद पवारांशी घनिष्ठ संबंध असताना उतारवयात त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेत राजकीय कारकीर्द सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला अाहे. भुजबळ हे गेल्या महिनाभरापासून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जाेर धरत अाहे. अातापर्यंत तीन ते चार पक्षप्रवेशाचे त्यांचे साेशल मीडियावर मुहूर्तही चर्चिले गेले.


भुजबळ यांनी प्रत्येक वेळी त्याचा इन्कारच केला असला तरी माताेश्रीशी त्यांची जवळीक वाढल्याचे व राष्ट्रवादीशी दुरावा झाल्याचे अनेक प्रकरणांतून दिसून अाले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिक दाैऱ्यात भुजबळ फिरकलेच नव्हते. इकडे, उत्तर महाराष्ट्रात भुजबळ यांचा अाेबीसी फॅक्टर शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्यामुळे माताेश्रीकडून त्यांना प्रवेशासाठी अनुकूलता असली तरी स्थानिक नेते मात्र विरोध करत आहेत.


श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार कांबळेंचा राजीनामा
श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. या वेळी त्यांच्यासाेबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यासह नेते उपस्थित होते. रविवारी कांबळे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

X