INX Case / आयएनएक्स घोटाळा : 95 मिनिटांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक

चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवल्यामुळे भिंतीवरून उडी मारून घरात दाखल झाले सीबीआय पथक 

दिव्य मराठी वेब

Aug 21,2019 11:12:53 PM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज रात्री 9:45 वाजता सीबाआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बुधवारी संध्याकाळी चिदंबरम यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. आपल्यावरील आरोपाचे खंडन करत आपण पळून गेलो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषद संपल्यानंतर चिदंबरम जोरबाग येथील आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले होते. सीबाआय, ईडी आणि दिल्ली पोलिस देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्यामुळे सीबाआयचे पथक भिंतीवरून उड्या मारुन घरात गेले आणि कारवाई केली. दरम्यान चिदंबरम यांना ताब्यात घेतल्यानंतर समर्थकांनी गोंधळ घातला.

हे सर्व भाजपाचे कारस्थान - कार्ती चिदंबरम यांचे ट्वीट
या कारवाईनंतर पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांनी ट्वीट केले, .या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की तपास यंत्रणांनी काही लोकांना आनंद देण्यासाठी या संपूर्ण प्रकरणात ड्रामेबाजी आणि सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला. ईडीने अनेकवेळा त्यांना समन्स पाठवले आणि प्रत्येक वेळी ते त्यांच्यासमोर हजर झाले. आम्ही निर्दोष आहोत. यामुळे आम्ही या प्रकरणाबाबत कोर्टात जाणार आहोत. या सगळ्यामागे भाजपाचे कारस्थान आहे.

27 तासांनंतर आले होते समोर..
सर्वोच्च न्यायलयाने दोन वेळा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पी.चिदंबरम बुधवारी संध्याकाळी पहिल्यांदाच काँग्रेस मुख्यालयात दाखल झाले. यावेळी चिदंबरम म्हणाले की, राज्यघटनेचा पाया स्वातंत्र्यात असल्याचा मला विश्वास आहे. संविधानाच्या कलम 21 मध्ये मला जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. मला जर जीवन आणि स्वातंत्र्यापैकी एक निवडायचे असेल तर मी स्वातंत्र्याची निवड करेन.

आरोपपत्रही दाखल करण्यात आले नाही - पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया केसमध्ये माझ्यावर किंवा कुटुंबातील सदस्यांवर कोणतेही आरोप करण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर याबाबत तपास यंत्रणांनी आरोपपत्रही दाखल केले नाही. मी काही चुकीचे केले असल्याचे एफआयआर मध्ये सांगण्यात आले नाही. मला आणि माझ्या मुलाल या प्रकरणात फसवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने मला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने माझा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

वकिलांसोबत सुनावणीची पूर्वतयारी करत होतो

माझ्या वकिलांनी मला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. कायद्यापासून पळून जात असल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला आहे. पण गेल्या 24 तासांपासून मी माझ्या वकिलांसोबत सुनावणीची पूर्वतयारी करत होतो. माझ्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे माझ्या वकिलांनी सांगितले. आता शुक्रवारपर्यंत मी ताठ मानेने जगू शकतो. मी कायद्याचा सन्मान करतो. तपास यंत्रणांनी सुद्धा कायद्याने पालन करावी एवढीच मी प्रार्थना करतो.

X
COMMENT