Home | National | Delhi | Former Interim CBI Director get punishment; sitting full day in the court 

मुझफ्फरपूर शेल्टर होम प्रकरण : सीबीआयच्या माजी अंतरिम संचालकांना दिवसभर कोर्टात बसण्याची शिक्षा 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 13, 2019, 07:36 AM IST

अवमानना प्रकरणी सीबीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यास प्रथमच अशा प्रकारची शिक्षा 

 • Former Interim CBI Director get punishment; sitting full day in the court 

  नवी दिल्ली- मुझफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणी तपास अधिकारी सीबीआयचे अधिकारी ए. के. शर्मा यांच्या बदलीस सर्वोच्च न्यायालयाने अवमानना मानले आहे. यासाठी कोर्टाने सीबीआयचे माजी अंतरिम संचालक नागेश्वर राव व अन्य एक अधिकारी एस. भासूरन यांना दोषी ठरवले आहे. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या दोघांना कोर्टरूमच्या कोपऱ्यात बसण्याची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपये दंडही ठोठावला. सीबीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला अशी शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल हे राव यांची बाजू मांडण्यासाठी आले. त्यावर मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई म्हणाले, अवमाननेतील आरोपीचा बचाव सरकारी खर्चातून का होत आहे ? मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, शेल्टर होम प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकातील बदल्या परवानगीशिवाय न करण्याचे निर्देश दिले होते. राव यांनी हे सर्व माहीत असताना ही त्यांनी शर्मा यांची बदली केली. मला जे करायचे होते, ते मी केले, अशी त्यांचे वर्तन होते. यावर वेणुगोपाल म्हणाले की, राव यांची ३२ वर्षांची कारकीर्द निष्कलंक आहे. माणूस चुकीचा पुतळा आहे. माफ करावे. मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, राव यांना माफ केले तरी त्यांचे करिअर डागाळलेलेच राहील.

  सुप्रीम कोर्ट लाइव्ह : दुपारच्या जेवणासाठी कोर्टरूम रिकामे झाले, राव-भासूरन यांना तेथेच बसावे लागले
  १० : ३० वाजता : नागेश्वर राव-भासूरन कोर्टरूममध्ये आले. दोघेही कोर्टासमोर खाली माना घालून उभे राहिले.

  ११ : ५० वाजता : राव आणि भासूरन यांना कोर्टरूमच्या कोपऱ्यात बसण्याची शिक्षा सुनावण्यात आली. दोघेही अभ्यागत कक्षाच्या एका कोपऱ्यात येऊन बसले. त्यांना वकिलांनी सांगितले, १ वाजता दुपारच्या जेवणावेळी त्यांना उठण्याची संधी मिळेल.

  १ : ०० वाजता : मुख्य न्यायमूर्तींचे पीठ जेवणासाठी निघाले, मात्र राव यांच्या संदर्भात काहीच बोलले नाहीत. कोर्टरूम रिकामी झाली. राव आणि भासूरन यांना मात्र तेथेच बसावे लागले.

  ३ : ०० वाजता : एका सीबीआयच्या अधिकाऱ्याने राव यांच्यासाठी डिस्पोझल कपात पाणी आणले.

  ३ : १५ वाजता : सीबीआयच्या वकिलाने राव यांना सांगितले ती, थोड्या वेळानंतर अॅटर्नी जनरल मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करतील. तोपर्यंत जागेवरच उभे राहावे लागेल.

  ३ : ४० वाजता : अॅटर्नी जनरल यांच्या इशाऱ्यानुसार राव उभे राहिले. अॅटर्नी जनरल यांनी विनंती केली की, यांना जाऊ द्या. मुख्य न्यायमूर्ती यांनी राव यांच्याकडे पाहत फटकारले, गुपचूप आहे तेथे बसून राहा. राव खाली बसले.

  ३ : ५० वाजता : कामकाज आटोपून पीठ उभे राहिले. राव यांनी आशाळभूत नजरेने मुख्य न्यायमूर्तींकडे पाहिले. मात्र, ते काहीच न बोलता निघून गेले. राव यांची जागेवरून उठण्याची हिंमत नाही झाली.

  ३ : ५७ वाजता : राव यांनी वकिलाला विचारले, मुदत संपली का ? उत्तर मिळाले- ३ मिनिटे शिल्लक आहेत.

  ४ : ०५ वाजता : राव वकिलाला म्हणाले, कोर्टाला विचारा माझी सुटका कधी होईल. वकिलांनी सांगितले, विचारण्यास गेले आहेत.

  ४ : १३ कोर्टाने राव आणि भासूरन यांना जाण्यास सांगितले.

 • Former Interim CBI Director get punishment; sitting full day in the court 

Trending