आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी संमेलनाध्यक्षांनी स्वीकारले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पालकत्व 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- भरदुपारची उन्हाची वेळ..धुळीचा फुफाटा उडवत एक गाडी एका मोडकळलेल्या जीर्ण घरासमोर थांबते..दारिद्र्याचा परिचय देणारी आसपासची मंडळी चेहऱ्यावर कुतूहल घेऊन गाडीभोवती जमतात...कोण असेल या वेळेला, ही शंका सगळ्यांच्या देहबोलीतून सहज वाचता येत होती. या गाडीतून उतरले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी... 


संमेलनातून समाजाकडे' अंतर्गत एका नामवंत साहित्यिकाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या भेटीला घेऊन जाण्याच्या 'दिव्य मराठी'ने आखलेल्या उपक्रमाअंतर्गत ही भेट होती. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांची बाजू मांडणारे लक्ष्मीकांत देशमुख व्यासपीठ सोडून थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या खेड्यातल्या घरात येतात, ही घटनाच अनपेक्षित असते. 

 

मग सुरू सुरू होतो एक द्वैभाषिक अनौपचारिक संवाद... 
यवतमाळपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरचे बोथबोडण गाव नुकतेच वेदनादायी वास्तवाला सामोरे गेले. उल्हास राठोड या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे २०१८ च्या दिवाळीपूर्वी आत्महत्या केल्याने गाव हादरले. राठोड यांच्या पत्नी छाया अशिक्षित आहे. त्यांना दोन गोजिरवाणी मुले. मुलगा सोहम तिसरीत तर मुलगी नंदिनी पहिलीत आहे. कुटुंबाची दोन-अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यात मुख्य पीक कापसाचे असले तरी दुष्काळामुळे खर्चाचा आकडा फुगलेला आणि उत्पन्न मात्र तळाशी, अशी स्थिती.

 

देशमुख सर हा इतिहास संवेदनशीलतेने जाणून घेतात. खरे तर छायाताईंचा उदास, भकास चेहराच हे सारे सांगत असतो. सुरुवातीला त्यांना काही बोलणेही शक्य होत नाही, दु:खाचा गहिवर दाटून आलेला कंठ, ओलावलेली नजर, गेल्या काही दिवसांत अनुभवलेली परवड आणि अंधारमय भविष्य...यांची त्या मूर्तिमंत 'छाया' असतात. मात्र, श्री व सौ अंजली देशमुखांच्या आपुलकीने, दिलाशाने त्या बंजारा बोलीत भयानक वास्तव कथन करतात तेव्हा कुठल्याही संवेदनशील मनाला वास्तवाचे चटके असह्य व्हावेत, असेच त्यांचे मनोगत असते. 

 

देशमुखांची तत्काळ मदत : 
लक्ष्मीकांत देशमुख यांनी छायाताई, मिट्टीबाई यांच्याकडून परिस्थिती समजून घेतली आणि तत्काळ अकरा हजार रुपयांचा धनादेश राठोड कुटुंबीयांच्या हवाली केला. आधी या वर्षासाठी शेतात बियाणे-खते यासाठीची तरतूद यातून करा, असे सांगत सरांनी धनादेश दिला तेव्हा ती माऊली डोळ्यांत अश्रू घेऊन थेट सरांच्या पायांशी वाकली. 

 

जिल्हाधिकाऱ्यांना केला फोन : 
लक्ष्मीकांत देशमुख यांचे संमेलनाध्यक्ष हे रूप गेल्या वर्षभरापासून वाचकांच्या, श्रोत्यांच्या नित्य परिचयाचे झाले आहे. पण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी सहृदयतेने पोचणाऱ्या देशमुख सरांमधील माणुसकीचा प्रत्यय यानिमित्ताने आला. एवढेच नव्हे, तर देशमुख सरांमधली पूर्वाश्रमीचा प्रशासकीय अधिकारी जागा झाला आणि त्यांनी त्वरित तिथूनच यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना फोन करून या घटनेची, परिस्थितीची कल्पना दिली. ते स्वत: राजेश देशमुख यांना भेटायला गेले आणि जिल्हाधिकारी देशमुख यांच्याकडून त्यांनी राठोड कुटुंबीयांसाठी त्वरित एक लाखाच्या मदतीचे स्पष्ट आश्वासन मिळवले. तसेच राठोड कुटुंबीयांना शासकीय मदत योजनेतून शक्य ती सर्व मदत लवकरात लवकर मिळेल, असेही राजेश देशमुख यांनी या वेळी सांगितले. 
 
मी मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी जगेन... 
राठोड कुटुंबीय बंजारा समाजबांधव. आई मिट्टीबाई, थोरला दिलीप, मधला उल्हास आणि धाकटा कैलास असे तीन भाऊ आणि एक बहीण असे कुटुंब. मात्र दिलीप यांना पाच अपत्ये, कैलास यांना चार आणि उल्हास यांना दोन अपत्ये, असे मोठे कुटुंब असल्याने ओढगस्तता कायमचीच. शेतात राबूनही फारसे काही पदरात पडत नसल्याने मिळेल ते काम, मिळेल ती मजुरी अशा पद्धतीने गुजराण सुरू असताना कर्जबाजारीपणाला कंटाळून उल्हास राठोड यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी छाया व दोन कच्चीबच्ची अनाथ झाली. मुले अजाणती असल्याने छायाताईंना सावरणे भाग पडले आणि त्यांच्यातली आई जागी झाली. 'आता मी मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी जगणार...दुसरे काय आहे? पडतील ते कष्ट करेन, मोलमजुरी करेन, शेतात राबेन पण मुलांना मोठे करायचे आहे..मी माहेरी जाणार नाही, सासरीच राहणार. आमचे एकत्र कुटुंब आहे, तिथेच असणार आणि पोरांना मोठं करणार....' हे त्यांचे सांगणे पुरेसे बोलके होते. 

 

९२ व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या नििमत्ताने यवतमाळमध्ये आलेल्या नामवंत साहित्यिकांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून दै. दिव्य मराठीने पुढाकार घेत 'संमेलनातून समाजाकडे' हा उपक्रम राबवला. याचाच एक भाग म्हणून साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यवतमाळजवळ असलेल्या बोथबोडण गावात राठोड कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. थोडी आर्थिक मदत आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करत एक प्रकारे पालकत्वही स्वीकारले.

बातम्या आणखी आहेत...