आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील सहकार, शिक्षण क्षेत्राचा आधारवड कोसळला; माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- अकोला जिल्ह्यात सहकाराची पाळेमुळे रुजवून भूमिपुत्राच्या जीवनात सुदिन आणण्यासाठी झटणारे ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव रामराव धोत्रे यांचे शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कुमुदिनी, मुलगा शिरीष, सुन अपर्णा, मुली अंजली कावरे, अर्चना गावंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. खासदार संजय धोत्रे यांचे ते चुलत भाऊ होत. 


वसंतराव धोत्रे यांचा जीवनपट 
वसंतराव धोत्रे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३७ रोजी पळसो बढे येथे शेतकरी कुटुंबात झाला. नागपूर विद्यापीठातून बी. कॉम. ची पदवी प्राप्त केल्यानंतर १९६० साली त्यांनी समाजकार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. १९६५-१९८६ अकोला सहकारी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष, १९६७-१९८५ जि. प. सदस्य, १९६५-१९८६ कुक्कुटपालन विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष, १९७१-१९८६ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, १९८७-१९९४ बाजार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, १९८५-१९९८ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक, १९८५-१९९० बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी, १९८६-१९८८ सहकार व वने राज्यमंत्री, १९८९-१९९३ कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष, १९८९-१९९७ जिल्हा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, १९९१-२००१ नीळकंठ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष, १९९१-२००१ राज्य सहकारी विणकर संस्थेचे संचालक, १९९३-२००० वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक, १९९४-२००२ बाजार समितीचे सभापती, १९९७-२००२ राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक तर १९९१-१९९३ दरम्यान इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप लि. नवी दिल्लीचे संचालक होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. 


आज होणार अंत्यसंस्कार 
वसंतराव धोत्रे यांची अंत्ययात्रा शनिवार, ११ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या तापडियानगरतील निवासस्थानाहून निघणार आहे. आणि उमरी मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

 
सभा जिंकणारा उत्तम वक्ता 
वसंतराव धोत्रे बोलायला लागले की सभेत खसखस पिकायची. त्यांच्या बोलण्यामध्ये सहजता होती. ग्रामीण बाज असलेले त्यांचे वक्तृत्व सर्वांना भावायचे. त्यांच्या जाण्याने सामाजिक भान जपणारा नेता आपल्यातून निघून गेल्याची भावना या भागात निर्माण झाली. सहकाराची परंपरा टिकून राहावी यासाठी त्यांचा अट्टहास असायचा. शेवटपर्यंत त्यांनी तो कणखरपणे जपला होता. 


बाजार समितीचे व्यवहार आज बंद 
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे आधारस्तंभ वसंतराव धोत्रे यांना श्रद्धांजली म्हणून शनिवारी बाजार समितीचे व्यवहार बंद राहतील. असा निर्णय व्यापारी आडतिया मंडळाने घेतला आहे. 


वरिष्ठ नेत्यांशी जवळचे नाते
कै. वसंतराव धोत्रे यांचे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी जवळचे नाते होते. अकोल्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी आले असताना त्यांच्या भेटीची संधी मिळाली. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार, माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर, रिपाइं नेते रा. सु. गवई, कै. पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, कै. प्रभाताई राव, कै. आर. आर. पाटील, अजित पवार, कै.जांबुवंतराव धोटे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे ऋणानुबंध होते. 


सहकार चळवळीचा आधारस्तंभ गेला 
वसंतराव धोत्रे यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आधारस्तंभ गेल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी व्यक्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...