आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन; सरपंचपदापासून सुरू केली होती राजकीय कारकीर्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- एकेकाळचे शिवसेनेचे झुंजार जिल्हाप्रमुख, माजी खासदार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मानसपुत्र मानलेले राजाभाऊ परशराम गोडसे (वय ५६) यांचे किडनीच्या विकारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. 

 

संसरी येथील रहिवासी असलेल्या राजाभाऊंनी त्यांची राजकीय कारकीर्द ही सरपंचपदापासून सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन राजाभाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वक्तृत्वाने आणि रांगड्या चेहऱ्याने तरुणांच्या मनामध्ये घर करून त्यांनी ग्रामीण भागात शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढविली. काकासाहेब सोलापूरकर, केशव थोरात, राजेंद्र बागूल यांच्यानंतर गोडसे हे थेट जिल्हाप्रमुख झाले. पक्षसंघटना तळागाळापर्यंत नेण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे सर्वाधिक काळ ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात विश्वासू जिल्हाप्रमुख राहिले. त्यामुळेच त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अाणि विजयाबराेबरच माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ते तेरा महिन्यांसाठी त्यांना खासदारकीदेखील मिळाली. शेवटच्या काळात ते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत गेले. मात्र, तेथेही त्यांचे मन अधिक काळ रमले नाही. किडनीचा आजार झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून घरीच आराम करीत होते. विकार बळावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. 


विसरणे शक्यच नाही 
राजाभाऊंचे माझ्यावर विशेष प्रेम असल्याने निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्यासाठी प्रचार केला. विजयी झाल्यानंतर सर्वात प्रथम बोलावून घेऊन संसरीच्या मारुती मंदिरामध्ये दर्शनाला नेले. त्यांच्याच गाडीतून प्रमाणपत्र घेण्यासाठी घेऊन गेले. त्यामुळे त्यांना विसरणे शक्यच नाही. 
- योगेश घोलप, आमदार 


ग्रामीण भागात शिवसेना वाढविली 
राजाभाऊ गोडसे हे जिल्हाप्रमुख असताना मी जिल्हा संघटक म्हणून काम करीत होतो. परंतु, राजाभांऊनी ग्रामीण भागात शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढविली. त्यामुळे ते बाळासाहेबांचे लाडके आणि आवडते जिल्हाप्रमुख होते. 
- दत्ता गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख 


नाशिकच्या राजकारणात पाेकळी 
एक अत्यंत जुना, बाळासाहेबांचा शिवसैनिक, खासदार, रांगडा, सच्चा दिलदार माणूस हरपल्याने नाशिकच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 
- विजय करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख 


पक्षकार्यामुळे मिळाले विशेष स्थान 
मी लहानपणापासूनच राजाभाऊ गाेडसेंसोबत राहिलो. ते अाम्हा सर्वांवर मुलांप्रमाणे प्रेम करीत असल्याने नाशिक जिल्हाभरात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट न विसरण्यासारखे आहे. त्यामुळेच ते बाळासाहेबांचे खास झाले होते. 
- बापू खोले, शिवसैनिक 


कट्टर शिवसैनिक गमावला 
राजाभाऊ गोडसे हे अतिशय कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे होते, बाळासाहेबांचे खास होते, त्यांनी सरपंचपदापासून प्रगती केली, खासदार झाले. त्यांच्या सर्व उपक्रमांमध्ये आम्ही सोबत होतो. आम्ही एका कट्टर शिवसैनिकाला गमावल्याचे दु:ख आहे. 
- बबन घोलप, माजी समाजकल्याण

बातम्या आणखी आहेत...