Maharashtra Politics / राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि नांदेडचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी, आमिता चव्हाण यांनी केला होता आरोप

त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबतच ते जातील त्या पक्षात जाण्यास तयार आहेत

दिव्य मराठी

Jul 29,2019 06:40:00 PM IST

नांदेड- राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात मोठी गळती लागली आहे. या गळतीचे परिणाम आता नांदेडमध्येही दिसू लागलेत. एकापेक्षा एक मोठ्या नेत्यांनी धक्के दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ताकदीचे नेते आहेत. नांदेडमध्ये त्यांच्या चाहत्यांची संख्या विलक्षण मोठी आहे. त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबतच ते जातील त्या पक्षात जाण्यास तयार आहेत.

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आज(29 जुलै) समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात समर्थकांनी भाजपात जाण्यासाठी गोरठेकर यांना आग्रह केला असल्याची माहिती समोर आली आहे. गोरठेकर यांनी भोकरमधून आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असाही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. विशेष म्हणजे भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच भोकरमध्ये गोरठेकर यांनी लढावे यासाठी समर्थकांनी आग्रह धरलाय.


दरम्यान यामुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार आहे. गोरठेकर यांच्यासोबत अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी सोडणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मला ईश्वरासमान आहेत, असे वक्तव्य बापूसाहेब यांनी केले. तसेच जिल्ह्यातील काही बिनकामांच्या नेत्यांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.


दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून बापूसाहेब देशमुख हे भाजपच्या व्यासपीठावर अनेकदा दिसून आले आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी त्यांचे सख्य लपून राहिलेले नाही. त्यामुळेच लोकसभेत पराभव झाल्यानंतर अमिता चव्हाण यांनी त्यांच्यावर विरोधात काम केल्याचा आरोप केला होता. पण राष्ट्रवादी सोडण्याबाबत त्यांनी प्रथमच जाहीरपणे भाष्य केले. तूर्तास गोरठेकर यांनी कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केले नसलं तरी ते भाजपात जाण्याची जास्त शक्यता आहे.

X