आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे माजी सिनेटर म्हणाले-बुश स्वत:वर विनोद ऐकवत असत, पण पंचलाइन विसरत असत; हे ऐकून ट्रम्प, ओबामा, क्लिंटन यांना आले हसू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हे छायाचित्र अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील नॅशनल कॅथेड्रलचे आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांची स्मृती सभा सुरू होती. त्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांची पत्नी मिशेल, बिल क्लिंटन, त्यांची पत्नी हिलरी, जिमी कार्टर आणि ज्युनियर बुश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेत जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी माजी सिनेटर अॅलन सिम्पसनही हजर होते. सिम्पसन म्हणाले की, 'बुश यांना विनोद आवडत असत. ते अचानक स्वत:वर एखादा विनोद ऐकवत असत, पण त्याची पंचलाइन विसरत असत.' त्यावर उपस्थित हसू लागले. 

११ मिनिटांच्या भाषणात सिम्पसन म्हणाले, बुश हजरजबाबी होते, पण त्यांनी आपल्या चुटक्यांमुळे कधी कोणाची भावना दुखावली नाही. बुश यांच्याशी घट्ट मैत्री होती. आमची पहिली भेट १९६२ मध्ये काँग्रेस बिल्डिंगमध्ये झाली होती. सिम्पसन यांच्यापासून अंतर ठेवा, असे बुश यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. माध्यमे माझ्यावर नेहमी टीका करत असत. तरीही बुश यांनी मैत्री सोडली नाही. त्यांचा नात्यांवर विश्वास होता. ते माझ्या मतदारसंघात नेहमी येत असत. एकदा बुश यांनी मला सकाळी अचानक फोन केला. ते हसत फोनवर म्हणाले की, माध्यमे तुला गोळी मारत आहेत, असे स्वप्न मी पाहिले आहे. कुटुंब आणि मित्र सर्वात मोठी ताकद आहे, त्यांच्याशिवाय कुठलेही मोठे काम केले जाऊ शकत नाही, असे बुश मानत असत. बुश यांचा एकच मंत्र होता-सत्याची कास धरा, इतरांवर आरोप करू नका, मजबूत व्हा आणि आपले सर्वोत्तम द्या. 

 

कार्यक्रमाला हजर असलेले बुश यांचे पुत्र ज्युनियर बुश म्हणाले की, मी नेतृत्वाचे धडे वडिलांकडून घेतले. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी मला समजावून सांगितली. या पदाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याची शिकवण दिली. इतिहासात जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे नाव अमेरिकेचे श्रेष्ठ राष्ट्राध्यक्ष म्हणून कोरले जाईल. भाषणादरम्यान ज्युनियर बुश यांना अश्रू आवरले नाहीत. वडिलांची आठवण करताना ते म्हणाले, तुमचे गांभीर्य, प्रेमळ हृदय आमच्या नेहमी आठवणीत राहील. ट्रम्प चार माजी अध्यक्षांसोबत मंचावर हजर असण्याची ही पहिलीच वेळ होती. सीनियर बुश यांचे ३० नोव्हेंबरला वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. 

 

अमेरिकेच्या नॅशनल कॅथेड्रलमध्ये जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या स्मृती सभेला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन, जिमी कार्टर आणि ज्युनियर बुश यांच्यासह हजर होते. 

बातम्या आणखी आहेत...