आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या मुंबईत PM पदाच्या उमेदवारीची घाेषणा झाली तिथेच अटलजींनी घेतली राजकीय निवृत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या महाराष्ट्र विशेषत: मुंबईशी संबंधित अनेक अाठवणी अाहेत. जनसंघांच्या सभा असाे की मित्रपक्ष शिवसेनेसाेबत भाजपच्या प्रचार सभा....  वाजपेयींची अमाेघ वाणी एेकण्यासाठी लाखाेंची गर्दी व्हायची. ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ ही घाेषणा अटलजींनी मुंबईतूनच केली, त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घाेषणाही येथेच झाली. राजकीय संन्यास घेण्याचे सूताेवाचही वाजपेयींनी येथेच केले. २००४ च्या लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईत अालेल्या वाजपेयींनी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट ‘श्वास’चा खास शाेही पाहिला हाेता.


वाजपेयी यांच्या राजकीय प्रवासाची १९५३ च्या काळात सुरूवात झाली होती. तेव्हा भारतीय जनता पार्टी जनसंघ नावाने कार्यरत होती. १९५३ मध्ये मुंबईत जनसंघातर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी वाजपेयी यांना बोलावण्यात आले होते. सभेला जाण्यासाठी तयार होत असताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी जो कुर्ता घालण्यासाठी काढलेला आहे तो काखेजवळ उसवलेला आहे. म्हणून त्यांनी दुसरा कुर्ता काढला, पण तो कुर्ताही गळ्याजवळ फाटला होता. आदल्या दिवशी दिल्ली येथे सभा घेऊन वाजपेयी फक्त दोन कुर्ते घेऊन मुंबईला आले होते. दोन्ही कुर्ते फाटलेले, त्यांच्याजवळ घालण्यासाठी अन्य काहीही नव्हते, त्यातच सभेची वेळ झालेली. वाजपेयी यांनी क्षणाचाही विलंब न लावता फाटलेला कुर्ता घातला आणि फाटलेला भाग दिसू नये म्हणून त्यावर जॅकेट घातले. वाजपेयींनी जॅकेट घालून भाषण दिले. त्यांच्या भाषणाने उपस्थित जनसमुदाय प्रचंड प्रभावित झाला आणि अटलजी झिंदाबादच्या घोषणा देऊ लागले.


२५ डिसेंबरला तर अनेकांचा जन्म होतो
अटलजींच्या एकसष्टीनिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांना ६१ लाख रुपयांची थैली देण्यात येणार होती.  स्वागताध्यक्ष राम जेठमलानी यांनी या वेळी भाषण करताना, अटलजींची जन्मतारीख २५ डिसेंबर म्हणून त्यांना ईसा मसीहाची उपमा दिली आणि वर्णन सुरू केले. प्रत्युत्तरात अटलजी म्हणाले, २५ डिसेंबर माझा जन्मदिवस ही मोठी बाब नाही. आज तुम्हाला मुंबईतील रुग्णालयात अनेक मुलांचे जन्म झालेले दिसेल. २५ डिसेंबरला अनेकांचा जन्म होतो.

 

अडवाणींनी केली   पंतप्रधानपदासाठी वाजपेयींची घोषणा
१९९५ मध्ये मुंबईत भाजपचे अधिवेशन होते. राम मंदिराच्या भूमिकेवरून संघ अटलजींवर नाराज होता. त्यामुळे अटलजी गप्प होते.  नेत्यांत त्यांच्याविषयी नाराजी नव्हती. पक्षाध्यक्ष अडवाणींंनी शिवाजी पार्कच्या सभेत अनपेक्षित ‘बॉम्ब’ टाकत आगामी निवडणुकीनंतर अटलजी पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. कार्यकर्त्यांनी त्या घोषणेनंतर ‘अगली बारी अटलबिहारी’ अशा घाेषणा दिल्या. उत्तरात अटलजी म्हणाले ‘भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले व पार्लमेंटरी कमिटीने मला नेता म्हणून निवडले तर मी नाही म्हणणार नाही.’ मात्र त्यांनी पंतप्रधान हा शब्द वापरला नाही.

 

‘कमल खिलेगा’ घोषणा मुंबईतूनच
भाजपची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले अधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात आले होते. १९८० मध्ये मुंबईत झालेल्या या सभेत बोलताना वाजपेयी म्हणाले, ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि संघर्षातून प्रेरणा घेणार आहोत. सामाजिक समतेचे बिगुल वाजवणारे महात्मा फुले आमचे पथ प्रदर्शक राहतील. देशाच्या पश्चिमी तटाला महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या या महासागराच्या किनाऱ्यावर उभा राहून मी ही भविष्यवाणी करण्याचे साहस करीत आहे, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा.’

 

शेवटचे भाषण मुंबईतच
वाजपेयींनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील शेवटचे भाषण मुंबईतच केले होते. २००५ मध्ये शिवाजी पार्कमधील या सभेच्या भाषणातच त्यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचेही जाहीर केले. या सभेनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी कोणत्याही सभेत भाषण केले नाही. शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात छोटे भाषण करताना त्यांनी ‘यापुढे मी कोणत्याही निवडणुकीला उभा राहाणार नाही’ असे जाहीर केले हाेते.

 

आचार्य अत्रे यांचे भाषण अटलजींनी मध्येच थांबवले
१९६९ मध्ये जनसंघाचे १५ वे वार्षिक अधिवेशन मुंबईत भरले होते.  वाजपेयी तेव्हा अध्यक्ष होते. मुंबईत आल्यानंतर वाजपेयी यांची शोभायात्रा कफ परेड ते चौपाटीपर्यंत काढण्यात आली. ती पाच तास चालली. अधिवेशनात आचार्य अत्रे यांचा अटलजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अत्रेंची ओळख करून देताना अटलजी म्हणाले, ‘अत्रेजी की टीकाटिप्पणी इतनी तेज होती है की कभी कभी उनके विरोधक हत्यार छोड के मैदानसे भाग जाते है..’ सत्काराला उत्तर देताना  अत्रे यांनी अटलजींचे तरुण नेता म्हणून कौतुक केले आणि महाराष्ट्र सरकारच्या शासकीय लॉटरी सुरु करण्याच्या निर्णयावर टीका करताना अत्रे म्हणाले, ‘लॉटरी सुरू करणारे हे काँग्रेस सरकार अजब आहे. उद्या हे लोक, सरकार भाड्याने चालवण्यास कोणाला तरी देतील’ अटलजींना मराठी समजत होते, पण त्यांना अत्रे यांच्या भाषणातील भाड्याने म्हणजे रेंटवर हा अर्थ समजला नाही. हिंदीत ‘भाड्या’ ही शिवी आहे. ते वाक्य ऐकताच अटलजी मराठीत म्हणाले, ‘जाऊ द्या ना अत्रेसाहेब..’ आणि आचार्य अत्रे यांचे भाषण अटलजींनी तेथेच थांबवले.

 

पुरणपोळी, साजूक तूप, मोदक ही वाजपेयींची फर्माईश....

अटलजी व चितळे कुटुंबीयांचा स्नेह कित्येक वर्षांचा होता. आमचे वडील बाळासाहेब चितळे व अटलजी नागपुरातील संघ वर्गाचे सहाध्यायी होते. तो काळ १९४३ च्या सुमाराचा होता. तेव्हापासून घरातील वडीलधारे व्यक्तिमत्त्व म्हणून अटलजी कुटुंबीयांना परिचित होते. हा संबंध थेट ते पंतप्रधान होईपर्यंत अखंड होता. पंतप्रधान बनल्यानंतर सुरक्षेच्या नियमावलींनी या भेटीगाठीत अंतर निर्माण झाले...पण मनातला जिव्हाळा नेहमीच कायम होता, अशा शब्दांत हॉटेल श्रेयसचे प्रमुख दत्तात्रेय चितळेंनी वाजपेयींविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.   अटलजींना कांदापोहे, पुरणपोळी, साजूक तूप लावलेले गरम फुलके, श्रीखंड हे पदार्थ विलक्षण आवडत असत. खाण्याच्या बाबतीत ते अतिशय रसज्ञ होते. आवडीने आणि चवीने खात असत, असे चितळे म्हणाले.   


विलक्षण संवेदनशीलता   
१९९६ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अटलजी एका दौऱ्यासाठी येणार होते. त्यांचा सर्व कार्यक्रम ठरलेला होता, पण ते संपूर्ण बाजूला ठेवून ते सर्वांत आधी आमच्याकडे माझ्या आईला भेटायला आवर्जून आले होते. ते आले, त्यांनी आमच्या सगळ्यांचे सांत्वन केले. त्यांच्या मनाची संवेदनशीलता तेव्हा प्रकर्षाने जाणवली, अशी आठवणही चितळे यांनी सांगितली.

 

हेही वाचा,

अटलजींचे 5 चर्चित किस्से...‘३ बुलाए, १३ आए; दे दाल में पानी’

 

 

बातम्या आणखी आहेत...