आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Prime Minister Jawaharlal Nehru Responsible For Kashmir Problem Mayawati Accused

काश्मीर समस्येसाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार - मायावतींचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - काश्मीरच्या समस्येसाठी माजी पंतप्रधान पंडित नेहरू जबाबदार असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. कलम ३७० हटवणे देशहिताचे असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे. काश्मीर खोऱ्यात स्थिती सामान्य होईपर्यंत विरोधी पक्षांनी संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मायावती यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली. या वेळी मायावती यांनी सांगितले की, बसपाची चळवळ पुढे नेण्यासाठी कोणतेही बलिदान देण्यास त्या तयार आहेत. तसेच पक्षाच्या आणि चळवळीच्या हितासाठी थांबणारही नाही आणि कोणापुढे झुकणारही नाही.

कलम ३७० हटवणे देशहितासाठी : जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवून राज्याचा विशेष दर्जा काढल्याबद्दल मायावती यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच देशात समानता, एकता आणि अखंडता यांच्या बाजूने होते आणि याच आधारावर ते जम्मू-काश्मिरात वेगळ्या कलम ३७० च्या बाजूने नव्हते. यामुळेच संसदेत बसपाने हे कलम हटवण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले. या समस्येचे मूळ कारण पंडित नेहरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जम्मू - काश्मीरपासून वेगळे करून लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाचे त्यांच्या पक्षाकडून स्वागत असल्याचे सांगितले. यामुळे लेह-लडाखमधील बौद्धांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. आता केंद्राने त्यांच्या मागणीनुसार वेगळी ओळख, त्यांची संस्कृती अाणि त्यांच्या भागासाठी आवश्यक असलेल्या विकासाकडे विशेष लक्ष द्यायला हवे, असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी बसपाची चळवळ पुढे नेण्यासाठी कोणतेही बलिदान देण्यास त्या तयार आहेत. तसेच पक्षाच्या आणि चळवळीच्या हितासाठी थांबणारही नाही आणि कोणापुढे झुकणारही नसल्याचेही मायावती यांनी सांगितले.
 

विरोधकांनी संयम बाळगावा
देशात संविधान लागू झाल्यानंतर जवळपास ७० वर्षांनंतर कलम ३७० हटवल्यानंतर तेथील परिस्थिती सामान्य होण्यास थोडा वेळ जाईल. यामुळे थोडी वाट बघायला हवी. यामुळे विनापरवानगी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि राज्यपालांना राजकारण करण्याची संधी देणे नव्हे का, असा सवाल करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काश्मिरात जाण्याने स्थिती बिघडली असती तर केंद्र सरकारने त्याचा दोष या पक्षांवर दिला नसता का, असेही त्या म्हणाल्या.
 

काँग्रेसवर टीका : दलित, आिदवासींबाबत उदासीन असल्याचा आरोप
कलम ३७० हटवण्याचे काम काँग्रेसने आधीच केले असते तर जम्मू - काश्मिरातील स्थिती चांगली राहिली असती आणि भाजपलाही या मुद्यावरुन राजकारण करण्याची संधी मिळाली नसती. काँग्रेस पक्षाचे गरीब, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक विशेष करुन मुस्लिम, शिख, ख्रिश्चन आणि बौद्धांबद्दल उदासीन धोरण राहिले आहे. यामुळेच या समाजांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांतही वाईटच राहिली. काँग्रेसच्या शासनकाळात बहुजन समाजाची एवढी उपेक्षा झाली की ते विसरणे शक्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत निवडून जाऊ दिले नाही तसेच नंतर भारतरत्न किताबाने सन्मानित केले नाही. दलित, आदिवासींना अारक्षणाचा लाभही प्रामाणिकपणे दिला नाही. तसेच कलम ३४० च्या नुसार ओबीसींना नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षणात आरक्षणाची संधी ४३ वर्षे दिली नाही.
 

बसप अध्यक्षपदी करण्यात आली फेरनिवड
केंद्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने पुन्हा एकदा मायावती यांची बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वास दिला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मानाची चळवळ आज मजबूत होत पुढे जात आहे. या चळवळीला साम, दाम, दंड, भेद आदींनी तोडता येणार नाही. उत्तरप्रदेशात बसपा सरकारने केलेल्या चांगल्या कामांच्या जोरावर ते इतर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मत देण्याचे आवाहन करतील. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली विधानसभा निवडणूक पक्ष पूर्ण ताकदीने लढेल. तसेच उत्तरप्रदेशातील १३ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीतही बसपासाठी चांगले निकाल येतील, अशी आशा व्यक्त केली.