Crime / शेतीच्या वादातून मारहाण, माजी सैनिकाचा जागीच मृत्यू ; तीन महिलांसह चार जण गंभीर जखमी

शेतजमिनीतील अर्धी मालकी द्यावी म्हणून चार वर्षांपासून लावला होता तगादा 

प्रतिनिधी

May 16,2019 08:40:00 AM IST

लोहारा - शेतजमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात करण्यात आलेल्या मारहाणीत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांसह चौघे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथे मंगळवारी रात्री घडली.


लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील माजी सैनिक बालाजी भगवान कवठे (५०) हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची सासरवाडी म्हणजेच कास्ती (बुुद्रुक) शिवारात मनोहर हरिपंत राकेलकर यांची पाच एकर ११ गुंठे शेतजमीन खरेदी केली. याच शेतात गेल्या वर्षी विहीर व विंधन विहीर घेतली आहे. ही शेतजमीन त्यांनी त्यांचे मेहुणे (पत्नीचा भाऊ) ज्ञानेश्वर व्यंकट चव्हाण यांना भागीन म्हणून कसण्यासाठी दिली होती, परंतु गेल्या चार वर्षांपासून त्या शेतजमिनीतील अर्धी मालकी द्यावी, यासाठी मेहुणा ज्ञानेश्वर याने बालाजी यांच्याकडे तगादा लावला होता. यावरून दोघात सातत्याने वाद निर्माण होत होता. ज्ञानेश्वर याने अनेक वेळा बहीण व भाऊजीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे याबाबत ज्ञानेश्वर याच्या विरोधात स्वत: बहिणीने पोलिसात तक्रार दिली होती.


मंगळवारी रात्री ज्ञानेश्वर चव्हाण याने सख्खा भाऊ असलेल्या सुधाकर चव्हाण यांच्या घरी येऊन तू बहीण, भाऊजीला मदत करतोस म्हणून त्यांना मारहाण करू लागला. या प्रकाराची माहिती मिळताच बालाजी कवठे हे कास्ती येथे आले. या वेळी ज्ञानेश्वर, त्यांची पत्नी अनुसया, मुलगा सचिन, तुषार यांनी मिळून मेहुणा बालाजी, भाऊ सुधाकर व त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी दिव्या यांना बेदम मारहाण सुुरू केली. तू शेत शेतच करतोस, आम्हाला देत नाहीस म्हणत तुषारने बालाजी कवठे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे दोन घाव घातले. यात बालाजी हे जागीच ठार झाले. त्यानंतर सचिन, तुषार यांनी दिव्याच्या तोंडावर कुऱ्हाडीचा वार केला. या मारहाणीत सुधाकर चव्हाण (५०), लक्ष्मी चव्हाण (४५), दिव्या चव्हाण (२४), मुक्ताबाई मधुकर लोभे हे गंभीर जखमी झाले. सुधाकर व दिव्या यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मृत बालाजी कवठे यांचा मुलगा अक्षय कवठे यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर चव्हाण, अनुसया चव्हाण, सचिन चव्हाण, तुषार या चौघा विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

X
COMMENT