आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाया भुसभुशीत; शिवस्मारकाचे काम थांबवा: मुख्यमंत्र्यांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अरबी समुद्रात राजभवनाजवळ उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठीच्या नियोजित स्थळी स्मारकाचा भार पेलवेल असा कठीण पाया नाही, असा दावा करत या स्मारकाचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी ‘आपली मुंबई’ या संस्थेने केली आहे.   


संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त व्हाइस अॅडमिरल आय. सी. राव यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सोमवारी याबाबतचे पत्र पाठवले. पत्रात म्हटले आहे की, एल अँड टी कंपनीने स्मारकस्थळी मे २०१८ मध्ये १०० मीटर खोलीचे एकूण १७ बोअर घेतले. त्यातले दोन बोअर्स २१२ मीटर उंच छत्रपतींचा पुतळा जेथे उभा करण्यात येणार आहे त्या खाली घेतले होते. त्या ठिकाणी ११ मीटर खाेलीपर्यंत जांभा दगड (कठीण) आढळून आला. मात्र त्याच्या खाली १०० मीटरपर्यंत ज्वालामुखीच्या राखेपासून (व्होलकॅनिक टफ) बनलेला खडक (ठिसूळ) आढळून आला आहे.  उर्वरित १५ बोअर्स घेतले.

 

त्याच्या ६ मीटर खोलीपर्यंत वाळू आढळली, तर त्याच्या खाली ३० मीटर खोलीपर्यंत ज्वालामुखीच्या राखेपासून बनलेला ठिसूळ असा खडक आढळून आला. त्यामुळे अशा भुसभुशीत पाया एकूण स्मारकाचे २० लाख टन (२ मिलियन) वजन पेलू शकणार नाही. भुसभुशीत पायामुळे छत्रपतींचे स्मारक भविष्यात कोसळून पडण्याचा धोका असल्याचा  दावा राव यांनी भूगर्भशास्त्रज्ञाच्या हवाल्याने केला आहे. स्मारकाच्या पायाची चाचणी एल अँड टी कंपनीने केली आहे. २१२ मीटर उंच पुतळ्याचा भार पेलवण्याइतपत पाया कठीण नसल्याचे कंपनीच्या लक्षात येऊनही स्मारकाचे काम कसे काय चालू आहे, असा प्रश्न राव यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे.   


छत्रपतींच्या स्मारकाला अपघात होऊ द्यायचा नसेल आणि साडेतीन हजार कोटींचा खर्च वाया जाऊ द्यायचा नसेल तर स्मारकासंदर्भात २८ फेब्रुवारी २०१४ रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय (जीआर) आणि १२ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रकल्पाच्या कामाचा दिलेली कार्यारंभ आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राव यांनी केली अाहे.  

 

कोण आहेत राव ?   
आय. सी. राव हे निवृत्त व्हाइस अॅडमिरल (कुलाबा) व आपली मुंबई संस्थेचे अध्यक्ष अाहेत. ते समुद्रविषयक जाणकार मानले जातात. स्मारकाची नियोजित जागा अयोग्य असल्याचे त्यांचे मत आहे. ‘आरटीआय’अन्वये त्यांनी स्मारक प्रकल्पातील अनेक अनागोंदी उघडकीस आणल्या आहेत. छत्रपतींचे स्मारक भाऊच्या धक्क्याशेजारच्या क्राॅस आयलँडवर करावे, अशी त्यांची मागणी अाहे.

बातम्या आणखी आहेत...