आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबीमध्ये चार बँकांचे विलीनीकरण; बँकिंग क्षेत्रात रोजगार कमी होण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकार स्थापन होण्याची वेळ जवळ आली असून त्याचबरोबर विलीनीकरणाच्या प्रक्रियेतही तेजी आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये (पीएनबी) तीन बँकांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. यामध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी), आंध्रा बँक, अलाहाबाद बँक आणि सिंडिकेट बँकेचा समावेश आहे. याआधी बँक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बँकेचे विलीनीकरण झाले आहे. या बँकांचे विलीनीकरण एक एप्रिल २०१९ पासून प्रभावी झाले आहे. याआधी एक एप्रिल २०१७ पासून एसबीआयमध्ये पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेचे विलीनीकरण प्रभावी झाले होते. आता बँकांच्या विलीनीकरणाचा पुढील टप्पा चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील १८ बँका आहेत.


अर्थ मंत्रालय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये विलीनीकरण-अधिग्रहणासाठी निवडलेल्या संभावित बँकांच्या संदर्भातील माहिती जमा करत आहे. विलीनीकरणानंतरच बँकांचे व्यवस्थापन सोपे होऊन बँकांची आर्थिक स्थिती कशा प्रकारे मजबूत होईल याचा अभ्यास यात करण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, सर्व बँकांच्या प्रमुखांकडून विलीनीकरणाच्या योजनेचा आराखडा मागवण्यात आला आहे. म्हणजे यासंदर्भातील प्रस्ताव नवीन सरकारसमोर ठेवता येईल. 


सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारने २०१७ मध्ये पर्यायी व्यवस्था केली होती. त्यानुसार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वातील मंत्र्यांचा गट निर्णय घेतो. या मंत्री गटाची स्थापना बँकांच्या कामकाजात गुणात्मक बदल करण्यासाठी करण्यात आली होती. तोट्यातील छोट्या बँकांचे विलीनीकरण एखाद्या मोठ्या बँकेत करण्याची सरकारची योजना आहे. यामुळे अनुत्पादित कर्जाच्या (एनपीए) रकमेमध्येही घट होईल आणि ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवले  जातील.
 

 

वृत्त येताच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये ३.७९ टक्क्यांपर्यंत तेजी
बँकिंग क्षेत्रातील शेअरचे तज्ज्ञ आदित्य जैन यांनी सांगितले की, प्रस्तावित विलीनीकरणानंतरच ग्राहक सेवांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. बँकांकडे कर्ज देण्यासाठी मोठी रक्कम असेल. यामुळे त्या बँका एसबीआयसारख्या मोठ्या बँकांशी स्पर्धा करू शकतील. त्यामुळे सरकारच्या वतीने विलीनीकरणाचा आराखडा मागताच सोमवारी पीएनबीचे शेअर १.२५ टक्क्यांच्या तेजीसह ८९.३० रुपयांवर बंद झाले. ओबीसी ३.७९ टक्क्यांनी वाढून १५०.५ रुपये, आंध्रा बँक १.३९ टक्क्यांनी वाढून २५.६० रुपये आणि अलाहाबाद बँकेचे शेअर ०.७५ टक्क्यांनी वाढून ४७.७५ रुपयांवर बंद झाले. सिंडिकेट बँकेच्या शेअरमध्ये २.९२ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली असून हे शेअर ३६.९५ रुपयांच्या दरावर बंद झाले.

 

बँकिंग क्षेत्रात रोजगार कमी होण्याची शक्यता
दिल्ली राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या महासचिव अश्विनी राणा यांनी सांगितले की, सार्वजनिक बँकांतील विलीनीकरणामुळे बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरण्याचा विचार केल्यास बँक ऑफ बडोदाने काही दिवसांतच ९५० शाखा बंद करण्याची घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...