Khamgaon / विहिरीजवळील माती खचल्याने चार मुले दबली; एका मुलाचा गुदमरून मृत्यू

विहिरीजवळील माती खचल्याने चार विद्यार्थी दाबले गेले. मात्र, वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्याने तिघांना  बाहेर काढण्यात यश आले

प्रतिनिधी

Jun 30,2019 09:34:00 AM IST

खामगाव - गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहिरीजवळील माती खचल्याने चार विद्यार्थी दाबले गेले. मात्र, वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्याने तिघांना बाहेर काढण्यात यश आले, तर एका विद्यार्थ्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी खामगाव तालुक्यातील पोरज येथे घडली. यशवंत प्रमोद हेरोडे(१२) असे मृताचे नाव आहे.


दरम्यान, मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दिवसभर नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने ही मोहीम अखेर यशस्वी झाली. खामगाव तालुक्यातील पोरज येथे ज्ञानगंगा नदीपात्रात बाजूलाच पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे. या विहिरीची पाणीपातळी खोल गेल्याने खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना बाहेर काढण्यात आलेले साहित्य, मलबा विहिरीनजीक टाकण्यात आला. दरम्यान, गत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे या विहिरीची पाणीपातळी वाढली. शनिवारी सकाळी शाळा सुटल्यावर साडेअकरा वाजताच्या सुमारास यशवंत प्रमोद हेरोडे (१२), तुषार गोपाल हेरोडे (१०), यश रामदास हेरोडे (१२) व मुकिंदा आत्माराम हेरोडे (१३) ही मुले या विहिरीची वाढलेली पाणीपातळी पाहण्यासाठी विहिरीलगतच्या मलब्यावर चढले व विहिरीत डोकावून पाणीपातळी पाहत असताना अचानक विहिरीजवळील मलबा २० ते २५ फूट खचला. या वेळी मुलांनी मोठ्याने एकच आवाज केला तर माती घसरल्याचाही मोठा आवाज आला. घसरलेल्या ढिगाऱ्यात चारही जण दाबले गेले. दरम्यान, वेळीच नागरिकांनी धाव घेत या मुलांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.


दाेन मुलांना दोरीने बाहेर काढण्यात यश
यामध्ये यश रामदास हेरोडे व मुकिंदा आत्माराम हेरोडे या दोघांना लवकरच बाहेर काढल्याने ते किरकोळ जखमी झाले, तर तुषार गोपाल हेरोडे याच्या डोक्यावर दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो दोराच्या साहाय्याने बाहेर आला.

X
COMMENT