आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा विसर्जनावेळी जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेल्या चौघा भाविकांचा जिल्ह्यात रविवारी वेगवेगळ्या घटनेत बुडून मृत्यू झाला. यामध्ये जळगाव शहरातील एक, भडगाव तालुक्यातील वलवाडी, जामनेर आणि वरणगाव फॅक्टरी येथील रहिवासी आहेत. यात तिघे युवक तर एका शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश आहे.

 
मन्यारखेडा तलावात जळगावच्या युवकाचा पाय घसरला 
जळगाव : गणपती विसर्जनासाठी मन्यारखेडा तलाव येथे गेलेल्या सुप्रीम कॉलनीतील तरुणाचा तलावात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. दरम्यान, मन्यारखेडा तलाव हे विसर्जनाचे अधिकृत स्थळ नसल्यामुळे तेथे जीवरक्षक, बोट या सुविधा नव्हत्या. अविनाश ईश्वर कोळी (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश हा सुप्रीम कॉलनीतील श्रीसाई मित्र मंडळाचा सदस्य होता. रविवारी दुपारी वाजत-गाजत मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मिरवणूक मन्यारखेडा येथील तलावावर पोहचली हाेती. मंडळाचे विसर्जन सुरू असताना अविनाश याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडू लागला. काही तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अविनाशला वाचवू शकले नाही. अखेर पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांनी काही मिनिटांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. 


मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती काठावरच सोडून देत अविनाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुळचे चोपडा तालुक्यातील कोळी कुटंुबीय कामाच्या निमित्ताने काही वर्षांपासून सुप्रीम कॉलनीत स्थायीक झाले आहेत. अविनाशच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आई कंपनीत काम करुन अविनाश व त्याच्या लहान बहिणीचा उदरनिर्वाह करीत आहे. अविनाश हा घरातील एकुलता मुलगा होता. तो सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. 


जामनेरच्या तरुणाचा मृत्यू 
जामनेर : पळासखेडा बुद्रूक गावाजवळील वाकी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खननाने निर्माण झालेल्या डोहात जामनेरच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश वामन दलाल (वय ४३) हे आपल्या आठ वर्षाच्या मुलासह गणेश विसर्जनासाठी घरापासून जवळच असलेल्या वाकी नदीवर गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने गणेश दलाल हे अचानक खोल डोहात बुडाले. वडील बुडाल्याचे लक्षात येताच मुलाने प्रमोद चोपडे यांना सांगितली. त्यांनी मोटारसायकल थांबवून मुलाचे म्हणने ऐकून घेत मदतीसाठी नागरिकांना माहिती दिली. बराच वेळ शोधूनही मृतदेह सापडत नव्हता. अखेर वा.जी.भोई यांनी मोठ्या प्रयत्नाने मृतदेह बाहेर काढले. 


वरणगावचा युवक पाण्यात बुडाला 
वरणगाव : हतनूर धरणाजवळील जुन्या पुलाजवळ तापी नदीपात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नितीन उखा मराठे (वय ३० रा. गोपाळ मार्केट, वरणगाव फॅक्टरी शिवार) पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता घडली. समाधान निकम हे गणपती विसर्जन करून आंघोळी करण्यासाठी नदी पात्रात उतरले होते. त्यात त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडू लागले. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. 


वलवाडीत विद्यार्थ्याचा मृत्यू 
भडगाव : वलवाडी येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रफुल्ल रमेश पाटील (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव अाहे. तो भडगाव येथील लाडकूबाई विद्यालयात इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत होता. 

बातम्या आणखी आहेत...