Suicide / बीड जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून २४ तासांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नापिकी व कर्जबाजारीपणाने आर्थिक विवंचनेत होते शेतकरी 

वृत्तसंस्था

Jul 15,2019 11:35:00 AM IST

बीड - दुष्काळी स्थिती व त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट अशा स्थितीत शेतकऱ्यांचा धीर सुटत आहे. २४ तासांत बीड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.


राजेवाडी (ता. माजलगाव) येथील गणेश गंगाधर घुबडे (२६) याने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना अवघी दीड एकर कोरडवाहू जमीन असून नापिकी व कर्जबाजारीपणाने ते आर्थिक विवंचनेत होते. आत्महत्येची दुसरी घटना मैंदा (ता. बीड) येथे घडली. केशव दादाराव मोमीन (५८) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वत:च्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांना ३ एकर जमीन आहे. त्यांच्याकडे बीडच्या युनियन बँकेचे ८० हजारांचे कर्ज होते. दुष्काळामुळे पीक वाया गेले. यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. तिसऱ्या घटनेत सुशी (ता. गेवराई) येथील बाबासाहेब भगवानराव भांडवलकर (६५) यांनी रविवारी दुपारी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. चौथी घटना केज शहरात घडली. बँकेतून पीक कर्ज म्हणून घेतलेल्या पैशाची परतफेड कशी करायची? या विवंचनेतून केज शहरातील बाबूराव शंकर गुंड या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

X
COMMENT