आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर | लातूर जिल्ह्यातील पोमादेवी जवळगा येथील शेतकऱ्याने शनिवारी विष घेऊन आत्महत्या केली. सततच्या नापिकीमुळे त्रस्त झाल्यामुळेच ही आत्महत्या झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पाऊस पडत आहे. त्यामुळे नापिकीचा सामना करावा लागत आहे. याही वर्षी जुलै मध्यावर येऊनही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट बनत चालली आहे. त्याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांचे मनौधैर्य कमी पडत आहे. त्यातूनच नागोराव दौला बनसोडे (रा. जवळगा पोमादेवी, ता. औसा) या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
लिंबाच्या झाडाला गळफास
अंबाजोगाई | सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. मधुकर लिंबाजी रुद्राक्ष (५५) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे
तालुक्यातील पठाण मांडवा येथील शेतकरी मधुकर रुद्राक्ष यांच्या शेतीवर बँक ऑफ बडोदा व सोसायटीचे कर्ज असून हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. मागील तीन वर्षांपासून सततची नापिकी आणि या वर्षीही पाऊस पडत नसल्याने ते हतबल झाले होते. याच निराशेतून त्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
भारतीय स्टेट बँकेचे ६० हजार रुपयांचे कर्ज
परभणी | जिंतूर तालुक्यातील भोसी येथील सखाराम गंगाराम गायकवाड (५८) यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. भारतीय स्टेट बँकेचे ६० हजार रुपये एवढे कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
दोन वर्षांपासून उत्पन्न समाधानकारक नाही
नांदेड | कंधार तालुक्यातील गऊळ येथील माणिक केशव वाकडे (३८) या शेतकऱ्याने घरातील स्लॅबच्या कडीला गळफास लावून आत्महत्या केली. वाकडे यांना दोन वर्षांपासून शेतातील उत्पन्न समाधानकारक झाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढतच गेला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.