आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाव फसला; चोरट्यांकडून कुलूप न तुटल्याने वाचले गुलमंडीवरील चार फ्लॅट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंंगाबाद- काही दिवसांपासून चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकूळ घातला आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुलमंडी येथील जेथलिया टॉवर्स अपार्टमेंटमधील ४ घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरुवारी २७ डिसेंबर सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान घडली. चारपैकी तीन घरांची कुलपे न तुटल्याने चोरट्यांचा डाव फसला. एक घर काही दिवसांपासून रिकामे असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

 

मध्यवर्ती आणि वर्दळीचा परिसर म्हणून गुलमंडीची ओळख आहे. याच भागात प्रमुख बाजारपेठ असल्याने रात्री उशिरापर्यंत या भागातील दुकाने चालू असतात. त्यामुळे नागरिकांची या भागात सतत वर्दळ असते. गुलमंडीवर जेथलिया टॉवर्स ही ६ मजली इमारत असून यात २४ फ्लॅट आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसात यादरम्यान चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरील श्यामसुंदर लढ्ढा, चौथ्या मजल्यावरील दीपल लढ्ढा, संजय जयस्वाल आणि पाचव्या मजल्यावरील प्रवीण भुमा यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु चारही घरांच्या दरवाजांना सेंट्रल लॉक असल्याने ते तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिसऱ्या मजल्यावरील श्यामसुंदर लढ्ढा यांच्या घराच्या बेडरूमचे लॉक न तुटल्याने चोरट्यांना निराश व्हावे लागले. दरम्यान, जेथलिया टॉवर्स येथील चारही घरांतून एकही वस्तू चोरीला न गेल्याने रहिवाशांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळले. जेथलिया टॉवर्स येथील तळमजल्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू तनवाणी, बंटी तनवाणी यांचे संपर्क कार्यालय आहे. अत्यंत वर्दळीच्या जेथलिया टॉवर्समधील चार घरे फोडण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरातील रहिवाशांत खळबळ उडाली आहे.

 

घर फोडून १२ हजारांचा ऐवज लंपास
मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करत १२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. जवाहरनगर परिसरातील दीपनगर भागात २६ डिसेंबरच्या रात्री हा प्रकार उघडकीस आला. घरमालक राजेश पंडितराव जुंबरे (४०) यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सात हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि पेनड्राइव्ह चोरट्यांनी पळवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...