आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Khelo India Youth Competition: Four Kho Kho Teams In Final Round; Challenge For Gold Medal On Thursday

खो-खोमध्ये महाराष्ट्राचे चारही संघ अंतिम फेरीत; गुरुवारी सुवर्णपदकासाठी देणार झुंज 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेलो इंडियात खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. महाराष्ट्राने खो-खो मुलांच्या १७ वर्षांखालील उपांत्य लढतीत तामिळनाडूचा १२-६ असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. त्या वेळी त्यांनी पूर्वार्धात १२-२ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राचा अंतिम सामना आंध्र प्रदेशच्या  संघाशी होणार आहे. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने अंतिम फेरीत स्थान मिळवताना पंजाबचा ७-६ असा पाच मिनिटे राखून पराभव केला. महाराष्ट्राला विजेतेपदासाठी दिल्ली संघाशी खेळावे लागणार आहे. मुलींच्या २१ वर्षंाखालील गटात महाराष्ट्राने ओडिशा संघाचे आव्हान १०-७ असे एक डाव तीन गुणांनी परतवले. महाराष्ट्राने २१ वर्षे मुलांच्या उपांत्य फेरीत गुजरातचा १३-९ असा १ डाव ४ गुणांनी पराभव केला. संघांचे पदक पक्के झाले.  

 

पुणे येथे शिवछत्रपती क्रीडानगरी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुरुवातीपासूनच महाराष्ट्राने आपले वर्चस्व  निर्माण केले आहे. मुष्टियुद्धात  १७ वर्षांखालील मुलींच्या गटात मितिका गुणेलेने  ६६ किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या अन्नू राणीचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. याचबरोबर महाराष्ट्राच्या आकाश गोरखानेही आपली विजयाची कामगिरी कायम ठेवली आहे. १७ वर्षांखालील ५७ किलो वजनी गटात त्याने  विजय नोंदवला. बास्केटबॉलमध्ये मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने कर्नाटकला पराभूत केले. तर मुलांच्या १७ वर्षांखालील गटात पंजाबच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला.  व्हॉलीबॉलमध्ये महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील बास्केटबॉल संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. या प्रकारामुळे आगामी तामिळनाडूविरोधी सामन्यात या गटात महाराष्ट्रासमाेर जिंका अथवा मरा अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
 
बुधवारी महाराष्ट्राला एकही सुवर्ण नाही  
खेलो इंडिया स्पर्धेत स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली. याच कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघाने एकूण ६४ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे. मात्र बुधवारी महाराष्ट्राच्या खात्यात एकही सुवर्णपदक जमा झाले नाही. हा दिवस सर्वच संघांसाठी समाधानकारक राहिला नाही. 

 

मुष्टियुद्ध स्पर्धेत मितिकाचा उपांत्य फेरीत प्रवेश; पदक केले निश्चित
महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने १७ वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी घोडदौड कायम ठेवत उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले. तिने ६६ किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या अन्नू राणी हिचा ५-० असा एकतर्फी पराभव केला.   


खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये बुधवारी (दि. १७) मुष्टियुद्धाचे सामने रंगले. यात मितिकाने हरियाणाच्या खेळाडूवर विजय नोंदवला. सुवर्णपदक मिळवायचेच हे ध्येय असल्याचे मितिकाने सांगितले.  परदेशातील स्पर्धांमधील अनुभव मला येथे खूप फायदेशीर ठरला आहे. महाराष्ट्राच्या आकाश गोरखाने १७ वर्षांखालील ५७ किलो वजनी विभागात आपलाच सहकारी थांगजामचा याच्यावर ३-२ अशी मात केली. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या रोहन पंडेरे याला मात्र उत्तर प्रदेशच्या राहुल मेमेगे याने ३-२ असे हरवले. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या लैश्राम सिंग याने पदकाच्या दिशेने वाटचाल राखताना आसामच्या इमदाद हुसेन याचे आव्हान ५-० असे संपुष्टात आणले. आकाशकुमार या महाराष्ट्राच्या खेळाडूला ६६ किलो विभागात उत्तराखंडच्या पंकजकुमार याने ३-२ असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या अमनदीपसिंग याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला हरियाणाच्या सुमीतकुमार याने  ५-० असे निष्प्रभ केले.

 

कबड्डी : महाराष्ट्र उपांत्य फेरीत
२१ वर्षाखालील गटामध्ये मुलींनी  महाराष्ट्राने  साखळी गटातील शेवटच्या लढतीत उत्तरप्रदेशचा ३८-२३ असा पराभव केला. पूर्वार्धात महाराष्ट्राने २०-१४ अशी आघाडी घेतली होती. त्याचा फायदा यजमान संघाला सामन्यात झाला. महाराष्ट्राच्या सोनाली हेळवी आणि आसावरी खोचरे यांनी केलेल्या खोलवर चढायांपुढे उत्तरप्रदेशचा बचाव निष्प्रभ ठरला. युपीकडून अमरीशकुमारी आणि शिवानी यांनी चांगल्या चढ्याया करत गुण वसूल केले. मात्र, त्या आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या. आता उपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर हिमाचल प्रदेश संघाचे आव्हान असेल. दुसरीकडे हरियाणा संघ आंध्र प्रदेश संघाविरुद्ध फायनलच्या तिकिटासाठी शड्डू ठोकणार आहे. 

 

टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, दीपितची विजयी आगेकूच
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिया चितळे, सृष्टी हेळंगडी व देव श्रॉफ यांनी टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत विजय मिळवला. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात दियाने कर्नाटकच्या अदिती जोशी हिचा ११-९, ११-६, १४-१२ असा पराभव केला. 

 

या गटात तेजल कांबळे हिला अनुषा कुटुंबळे या मध्य प्रदेशच्या खेळाडूने ११-८, १४-१२, ११-९ असे हरवले. समृद्धी कुलकर्णी हिला राधाप्रिया गोयल (उत्तर प्रदेश) हिच्याकडून ६-११, १२-१०, २-११, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात सृष्टी हिने तेलंगणाच्या अकुला श्रीजा हिच्यावर ११-८, ११-९, ११-७ अशी सरळ तीन गेम्समध्ये मात केली. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात दीपित पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूने दिल्लीच्या आरुष दत्त याचा ११-६, ११-८, ३-११, ११-९ असा पराभव केला. देव श्रॉफ याने अंदमान व निकोबारच्या सॅम्युअल अडवाणी याच्यावर ११-५, ११-६, ११-३ असा दणदणीत विजय नोंदवला.

 

आर्यन, मिहिका अंतिम फेरीत दाखल
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिसमध्येही आपला डंका वाजवला आहे. १७ वर्षांखालील गटात  आर्यन भाटियाने, तर २१ वर्षांखालील गटात मिहिका यादवने अंतिम फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. याबरोबरच  महाराष्ट्राच्याच गार्गी पवार, प्रेरणा विचारे यांनाही टेनिसमध्ये यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे.  
 
बुधवारी टेनिसचे सामने रंगले. यात  मुलांच्या १७ वर्षांखालील गटात आर्यन याने अग्रमानांकित सुशांत दबस या हरियाणाच्या खेळाडूवर विजय मिळवला. चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत आर्यनने ७-५, ३-६, ६-२ असा विजय नोंदवला. मुलींच्या २१ वर्षांखालील एकेरीत मिहिका हिने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशच्या काव्या सवानी हिच्यावर ६-३, ६-३ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवला. तिने दोन्ही सेट्समध्ये परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच तिने सर्व्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते.
 

बातम्या आणखी आहेत...