Home | Maharashtra | Vidarva | Akola | Four murders in 20 days; 'LCB' find criminals in 48 hours

२० दिवसांत चौघांच्या हत्या; ४८ तासांत 'एलसीबी'ने लावला छडा

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 11:59 AM IST

एकापाठोपाठ जिल्ह्यात २० दिवसांत चौघांच्या निर्घृण हत्या झाल्या. त्यात दोन राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

 • Four murders in 20 days; 'LCB' find criminals in 48 hours

  अकोला- एकापाठोपाठ जिल्ह्यात २० दिवसांत चौघांच्या निर्घृण हत्या झाल्या. त्यात दोन राजकीय नेत्यांचा समावेश आहे. मात्र चारही हत्याकांडाचा छडा जनभावनेचा उद्रेक होण्याआधीच पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) माध्यमातून ४८ तासातच लावल्याने पोलिसांची कार्यक्षमता दिसून आली.


  बड्या राजकीय नेत्यांच्या एकापाठोपाठ हत्या झाल्याने पोलिसांनी धीरोदात्तपणे गुन्ह्याचा यशस्वीरीत्या तपास करून शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ३० जुलैच्या रात्री आम आदमी पार्टीचे नेते मुकीम अहमद व त्यांचे साथीदार शेख शफी यांची शहरातील आझाद कॉलनीत गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. मात्र पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे प्रमुख कैलास नागरे यांच्या टीमने गुन्ह्याचा छडा लावला व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सर्व १४ आरोपींनी हत्याकांडाची कबुली दिली. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी भारिप बहुजन महासंघाचे नेते तथा वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.


  या प्रकरणातही आसिफ खान यांचा मृतदेह सापडत नव्हता. मात्र एलसीबीने याप्रकरणी योग्य दिशेने तपास करून वाशीमची माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती अनिल गणेशपुरेसह सहा आरोपींचा कबुलीजबाब घेतला व त्यात त्यांना यश आले. आसिफ खान व मुकीम अहमद या दोन्ही राजकीय नेत्यांच्या हत्याकांडाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथे एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. या हत्याकांडाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याच्या निष्कर्षापर्यंत एलसीबी पोहोचली होती. त्यानंतर बार्शीटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी आरोपी आरोग्य सेवकाला पकडून अटक केली. त्याने प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या केल्याची कबुली दिली.


  एलसीबीचा डिटेक्शन रेट वाढला
  एलसीबीची धूरा पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी घेतल्यानंतर एकापाठोपाठ गुन्ह्याच्या तपासात त्यांना यश येत आहे. वर्षभरापासून एलसीबीचा डिटेक्शन रेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. या यशाचे श्रेय ते त्यांच्या अधिनस्त असलेले सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, पीएसआय योगेंद्र मोरे, पीएसआय रणजितसिंग ठाकूर, एएसआय अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजिद, संदीप काटकर, शक्ती कांबळे, प्रमोद डोईफोडे, रवी इरचे, प्रमोद चव्हाण, मनोज नागमते, शक्ती कांबळे अमित दुबे, आशिष ठाकूर यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना देतात.


  यापूर्वीचे ठळक डिटेक्शन असे
  - हिंगणा म्हैसपूर येथील बन्सी ठाकूर हत्याकांड
  - वीज तारांची चोरी करणारी टोळी केली जेरबंद
  - घरफोडी करणारे चोरट्यांचा बंदोबस्त
  - दुचाकी चोरणाऱ्यांच्या रॅकेट आणले उघडकीस
  - मुकीम अहमद हत्याकांडाचा छडा
  - आसिफ खान हत्याकांडाचा छडा

Trending