Maharashtra Politics / काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार, चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले राजीनामे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग होत आहे

दिव्य मराठी

Jul 31,2019 03:09:19 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, तर अनेक नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 4 आमदार राजीनामे दिलेत.


साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी सगळ्यात आधी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राजीनामा दिला. त्यानंतर अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, मुंबईतील वडाळाचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर राजीनामा देण्यासाठी विधान भवनात आले. याशिवाय नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईकांनी सुद्ध विधानभवन गाठले.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग होत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेत इनकमिंग होत आहे, तर विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग होत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड आणि संदीप नाईक हे सुद्धा पक्ष सोडणार असल्याने, या धक्क्यांमध्ये वाढ होत आहे.

कोणावरही दबाव नाही- गिरीश महाजन
या राजीनाम्या नाट्यानंतर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, "कोणावरही दबाव टाकला जात नाहीये. त्यांना माहितीय आपले भविष्य आता भाजपच्या हातात आहे. राष्ट्रवादी पक्ष आता फक्त पवार कुटुंबियांपुरता मर्यादित राहिला आहे, लवकरच त्यांच्यातले अजून नेते येतील. घराणेशाहीला कंटाळून लोक येत आहेत."

X