accident / नाशिक जिल्ह्यात बुडून मायलेकासह चौघांचा मृत्यू, सुदैवाने ५ मुली बचावल्या

मामाच्या गावी आलेल्या मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या धरणात

प्रतिनिधी

Jun 10,2019 09:54:00 AM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून एका महिलेसह २ मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. दिंडोरी येथील कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिचा मुलगा आणि एका अन्य मुलीसह प्राण गेला, तर पेठ तालुक्यातील अासरबारी येथील धरणात कपडे धुऊन झाल्यानंतर पाेहण्यास गेलेल्या पाच मुलींपैकी एक बुडून ठार झाली. अनिता यादव वाघमारे (२९), ओंकार यादव वाघमारे (१४, दोघेही रा. उमराळे), प्राजक्ता गांगोडे (१५, ओझे) ज्योती जाधव (१२, आसरबारी) अशी मृतांची नावे आहेत.


दिंडोरी तालुक्यातील उमराळे खुर्द येथे अंगणवाडी मदनसी असलेल्या अनिता यादव वाघमारे या मुलगा ओंकारसह ओझे येथे फशाबाई उघडे यांच्याकडे यात्रेनिमित्त आल्या होत्या. रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्या शेजारीच राहणाऱ्या प्राजक्ता बाळू गांगोडे हिच्यासोबत कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने पाण्यात पडून तिघांचाही बुडून मृत्यू झाला. ही बातमी ओझे गावात समजताच गावातील युवक व ग्रामस्थांनी कादवा नदीकडे धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, नदीला करंजवण धरणाचे पाणी सोडलेले असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे अभियंत्याशी संपर्क साधून त्वरित पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर मृतदेहांचा शोध घेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे, वणीचे पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी आदी घटनास्थळी दाखल झाले.

मामाच्या गावी आलेल्या मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या धरणात

रविवारी दुपारी तीन वाजता आसरबारी येथील जयश्री भुसारे, साक्षी भुसारे (१४, रा. सादराळे) या दाेघी बहिणींसह नात्यातीलच ज्याेती जाधव (१२), अर्चना जाधव (१६) व दीक्षा जाधव (११) या कपडे धुण्यासाठी आसरबारी येथील धरणात गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर त्या पाेहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ज्याेती व साक्षी बुडाल्या. धरणावर उपस्थित एका मुलाने इतरांना बाहेर काढले. मात्र, ज्योती बुडाली. साक्षी व जयश्री या दिंडाेरी तालुक्यातीलच सादराळे येथील रहिवासी हाेत्या. सुटीनिमित्त त्या मामाकडे येथे आल्या हाेत्या. दुपारी ३ वाजता घडलेल्या या घटनेतील ज्योतीचा मृतदेह शाेधण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू हाेते. ज्योतीचे वडील कल्याण येथे पाेलिस दलात कार्यरत आहेत.

X
COMMENT