Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Four thieves caught by a female army officer after chasing one and a half hour

दीड तास पाठलाग करून महिला फौजदाराने पकडले 4 चोरट्यांना

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 11:10 AM IST

तीन घटना, ३ तऱ्हा वाळूज अन् अायुक्तालयात मात्र हातावर तुरी

 • Four thieves caught by a female army officer after chasing one and a half hour

  औरंगाबाद - महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांनी सुमारे दीड तास पाठलाग करुन शुक्रवारी रात्री बीड बायपासवर ट्रक चालकाला लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. सुशीला खरात असे या बहाद्दर महिला फौजदाराचे नाव असून त्यांनी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी या चौघा लुटारूंना पोलिस पकडून ठेवले होते. या चोरट्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी, चार मोबाइल व ट्रकचालकाकडून लुटलेले रोख १ हजार ६०० रुपये असा एकूण ६१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

  राजू सुधाकर सोनवणे (३१, रा.अथर्वनगर, सातारा), व़ृद्धेश्वर मधुकर गिरी ( १९), नजीर निजामोद्दीन शेख (२४, दोघे रा.संग्रामनगर, सातारा परिसर), संदीप जयसिंग बरथुने ( २७, रा.हायकोर्ट कॉलनी, सातारा) अशी या चौघांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री पाऊणच्या सुमारास राजेश तांडेकर (४२, रा.भांडेगाव, ता.दारव्हा) पेट्रोलचा टँकर (एमएच ०४ एचएस २०५२)

  घेऊन मुंबई येथून कारंजा येथे जात होते. बीड बायपासवरून जाणाऱ्या तांडेकर यांना चौघांनी श्रीराज टीव्हीएसच्या शोरूमसमोर हात दाखवून थांबवले. तांडेकर यांनी ट्रक थांबवताच दोघे केबिनमध्ये शिरले. तांडेकर यांच्यासह क्लीनरला बेदम मारहाण करीत १ हजार ६०० रुपये हिसकावून त्यांनी पोबारा केला. तांडेकर यांनी गोदावरी हॉटेल चौकात कोम्बिंग ऑपरेशन करीत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात, जमादार आसाराम मर्कड, व्ही.एन.संतान्से, एस.बी.चव्हाण, बहुरे यांना घटनेची माहिती दिली.

  तसेच चोरटे दुचाकीवरून पसार झाले असल्याचे सांगितले. खरात यांनी पथकातील दोन कर्मचाऱ्यांसह या टोळीचा शोध सुरू केला. जखमी ट्रक चालकालाही सोबत घेतले. बीड बायपासवरील कोमल हॉटेलजवळ पथकाने या टोळीला पकडले. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून दोन दुचाकी (एमएच २० सीएन ९००९, एमएच २० ईपी २९९०), चार मोबाइल व लुटलेले पैसे जप्त केले आहेत. या टोळीविरुद्ध सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक चेतन ओगले तपास करीत आहेत.


  दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने बांधल्या चौघांच्या मुसक्या : घटनेची माहिती मिळताच खरात यांनी दोन कर्मचारी एका दिशेने पाठवले. उर्वरित दोन कर्मचाऱ्यांसह अन्य मार्गांवर स्वत: तपास सुरू केला. गस्तीवर निघालेल्या पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनाही याबाबत माहिती दिली. मध्यरात्री साडेबारा ते दीडपर्यंत हा पाठलाग सुरू होता. या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर चंद्रमोरे घटनास्थळी येईपर्यंत खरात आणि त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांनी या चारही जणांना पकडून ठेवले. चंद्रमोरे घटनास्थळी पोहोचल्यानंतर या टोळीला सातारा ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, यातील नजीर निजामोद्दीन शेख याचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले होते.

Trending