आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७ दिवसांमध्ये चार महिलांची साखळी लंपास, शनिवारीही घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरात १५ नोव्हेंबरपासून दुचाकीवरील चोरट्यांनी धूमस्टाईलने महिलांची सोनसाखळी लांबवण्याचे सत्र सुरू केले आहे. गेल्या १७ दिवसांच्या काळात शहरात तब्बल चार ठिकाणी हे प्रकार घडले. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगरोडवरील सृष्टी ट्रेडर्सजवळ शनिवारी रात्री ९.३० वाजता फिरण्यासाठी निघालेल्या वल्लभनगर भागातील प्रतिभा विष्णू फालक या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. १७ दिवसांत तब्बल चार महिलांची साखळी एकाच पद्धतीने चोरट्यांनी लांबवली. यामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास मात्र शून्य आहे. 

 

शहरात दिवाळीनंतरच्या काळापासून धूमस्टाईलने महिलांचे मंगळसूत्र लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. १५ नोव्हेंबरला शांतीनगर परिसरातील शारदानगर भागात सोनसाखळी धूमस्टाईलने लांबवण्यात आली. तर २२ नोव्हेंबरला पत्री शाळेजवळ असाच प्रकार घडला. या पाठोपाठ शहरातील हुडको भागातही मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र लांबवले. गजानन महाराजनगरात घडलेल्या या प्रकाराबाबत फिर्यादी महिलेने पोलिसांना (एमएच.१९-डी.२४४६) हा क्रमांक दिला होता. मात्र या तिन्ही चोऱ्यांबद्दल तपास शून्य आहे. या प्रकारानंतर शनिवारी (दि. १) रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान, रिंगरोडवरील सृष्टी ट्रेडर्स भागात वल्लभनगरात रहिवास असलेल्या फालक नामक महिलेचे मंगळसूत्र पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी लांबवले. सुदैवाने महिला सावध झाल्याने चोरट्यांच्या हातात केवळ मंगळसूत्राची दोन पदके (वाट्या) व चार मणी असा सुमारे आठ ते दहा ग्रॅम वजनाचा ऐवज लागला. उर्वरित तुटलेले मंगळसूत्र खाली पडल्याने नुकसान टळले. धूमस्टाईलने मंगळसूत्र लांबवणाच्या चार घटना घडल्यानंतरही पोलिसांचा तपास मात्र शून्य आहे.
 
घटना क्रमांक : १ | गजानन महाराज नगरात १५ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता शतपावली करणाऱ्या सुरेखा पंडीत इंगळे यांचया गळ्यातील ३२ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र धुम स्टाईलने लांबवले. पॅशन प्रो कंपनीच्या दुचाकी एमएच १९ : २४४६ हा क्रमांक फिर्यादीने पोलिसांना दिला होता. 


घटना क्रमांक : २ | शारदा नगरातील रहिवासी रंजना सुधाकर चौधरी या २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता महिलांसह मंदिरातून घरी जात असताना दुचाकीवरुन भरधाव वेगाने आलेल्या चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र ओढून नेले. ३५ ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचे मंत्रळसुत्र चोरीची नोंद करण्यात आली होती. 


घटना क्रमांक : ३ | शहरातील हूडको भागात २५ नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान प्रतिभा विजय पाटील हा त्यांची मुलगी जान्हवी सोबत शतपावली करीत होत्या, याच दरम्यान मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या मंगळसूत्राला हिसका देवून पळ काढला. एक तोळा वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले. 


घटना क्रमांक : ४ | शहरातील जळगावरोडवरील रिंगरोड परिसरातील सृष्टी टेडर्स जवळ शनिवारी रात्री एका महिलेचे मंगळसूू़त्र मोटारसायकलवरुन आलेल्या टोळीने हिसका देवून तोडले. मात्र त्यांच्या हातात मंगळसूत्रांचे दोन पदके व चार मणी मिळाले, मंगळसूत्र तुटल्याने ते खाली पडले. चोरट्यांनी मोटारसायकलवरुन तत्काळ पळ काढला. या प्रकरणी मात्र पोलिसांत गुन्ह्याची नोंद नाही. 


चोऱ्यांचा तपास शून्य...

धूमस्टाईल सोबतच शहरात गेल्या तीन ते चार महिन्यांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत गेल्या चार महिन्यांत झालेल्या एकाही चोरीचा तपास पूर्ण केला नाही. ११ नोव्हेंबरला राजेंद्र देशपांडे यांच्या घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या चोरीचा तपासही थंड बस्त्यात अडकला आहे

 

पोलिसांनी गस्त वाढवली...

शहरातील पत्री शाळा, हुडको, सहकारनगर, शांतीनगर आदी भागात आता पोलिसांनी गस्त वाढवली आहे. यासह दोन दिवसांपासून दिवसाच्या वेळी देखील पोलिसांनी गस्त सुरु केली आहे. मंगळसूत्र लांबवण्याचे प्रकार पथदिवे बंद असलेल्या ठिकाणी अधिक प्रमाणात घडत आहे. यामुळे पालिकेने पथदिव्यांचे नियोजन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...