आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर व पाचोरा तालुक्यात चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंढरपुरातही दोघे वाहून गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर/पाचोरा - नदी व बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तर सुदैवाने एक तरुण बचावला. अमळनेर व पाचोरा तालुक्यात रविवारी एकाच दिवशी या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. 
हेमंत संजय पाटील (वय २२, रा.पळासदळे, ता.अमळनेर), अंकित चतुर पाटील (रा. कुरखळी, ता. शिरपूर, जि.धुळे), संदीप तात्याराव चव्हाण (वय २०) व नीलेश अंबादास चव्हाण (वय १८, दोघे रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी मृत झालेल्या तरूणांची नावे आहेत. 

शिरपूर तालुक्यातील कुरखळी रहिवासी व येथील प्रताप महाविद्यालयात बीसीए शाखेतील तृतीय वर्षाचा विद्यार्थी अंकीत चतुर पाटील हा  वसतिगृहात राहत होता, प्रताप महाविद्यालयातील गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यासाठी  तो  धार रस्त्यावरील धार पाझर तलावात  गेला असता तलावातील गाळात  त्याचा बुडून मृत्यू झाला.  तर दुसरी घटना अमळनेर तालुक्यातील पळासदळे येथे घडली.  हेमंत संजय पाटील हा परिसरातील चिखली नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला असता त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू  झाला. 

पाचोरा तालक्यातील शिंदाड येथील केटी वेअर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या संदीप तात्याराव चव्हाण व नीलेश अंबादास चव्हाण या  सख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला. तर एक जण बचावण्यात यश आले. मोहरमनिमित्त मामाकडे असलेल्या उरुससाठी ते सिल्लोड येथून आले होते.  पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा मृत्यू झाला.
 

बंधाऱ्यावर मोटारसायकल धुताना गेला तोल
 पंढरपूर
तालुक्यातील गुरसाळे येथील दोन तरूण भीमा नदीवरील गुरसाळे बंधाऱ्यावर मोबाईलवर सेल्फी काढून झाल्यावर मोटारसायकल धुवत असताना घसरून पाण्यात पडल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण सिताराम खंकाळ (वय १९)  आणि स्वप्निल सिताराम शिंदे (वय १८ ) अशी वाहुन गेलेल्या तरुणांची नावे आहेत. पंढरपूर नगरपरिषदेच्या यांत्रिक बोटीच्या सहाय्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

या घटनेची समजलेली माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील लक्ष्मण खंकाळ व स्वप्निल शिंदे हे दोघे मित्र रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकली वरून गुरसाळे बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते, सेल्फी काढून झाल्यावर मोटारसायकल धुवत असताताना स्वप्निल शिंदे हा बंधाऱ्यावरुन घसरून पाण्यात पडला व ओरडू लागला त्याच वेळी लक्ष्मण खंकाळ याने बुडणाऱ्या स्वप्निलला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र दुथडी भरून वाहणाऱ्या चंद्रभागेत दोघेही वाहून गेले.   
 

जीवघेणी शर्यत, पूलावरून उडी मारणारा तरुण बुडाला
पुणे | भिडे पूलावरून पाण्यात उडी मारण्याच्या शर्यतीतून एक तरुण प्रवाहात वाहून गेला आहे. तर दुसऱ्या तरुणाला नदीपात्रातील पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी डेक्कन परिसरातील नदीपात्रात घडली. धरणसाखळीत संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून १८ हजार ५०० क्युसेकने पाणी प्रवाह नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे डेक्कन परिसरातील भिडे पूलालगत पाण्याचा प्रवाह वाहत आहे.  या पुलावरून प्रकाश व आसिमने  उडी मारण्याची शर्यत लावली. दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहत गेले. त्यापैकी एक तरुण पोहत पाण्याबाहेर निघाला. मात्र, दुसरा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानुसार अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेउन शोधमोहिमा सुरु केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला नाही.
 
 

बातम्या आणखी आहेत...