आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज चेअरमनपदाचे आमिष दाखवून ३३ लाखांचा गंडा, व्यावसायिकाची फसवणूक, आरोपींचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस अधिकारी, राजकारणी, मंत्रालयात मोठ्या अधिकाऱ्यांच्या आेळखी असल्याचे सांगून तिघांनी शहरातील बांधकाम व्यावसायिकाला हज कमिटीच्या चेअरमनपदाचे आमिष दाखवून ३३ लाख रुपयांना गंडा घातला. तीन वर्षे वाट पाहूनही पद अन् पैसे परत मिळत नसल्याने व्यावसायिकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. 

 

आरेफोद्दीन सिद्दिकी नुरुद्दीन सिद्दिकी (४३, रा. जयसिंगपुरा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. जानेवारी २०१५ मध्ये त्यांचे शिक्षक असलेले मित्र हाफिज खालेद यांच्यासोबत बांधकाम व्यवसायाच्या जाहिरातीसंदर्भात चर्चा सुरू होती. खालेद यांनी त्यांना त्यांचा मित्र मौलाना सादिक (रा. औरंगाबाद, मूळ भोपाळ) हा दूरदर्शनवर जाहिरातीसाठी मदत करू शकतो असे सांगितले. सादिकसोबत चर्चा केल्यानंतर त्याने त्याच्या ओळखीचे खालेद राहगीब (रा. दिल्ली) हे दूरदर्शनमध्ये कार्यरत असल्याचे सांगत त्यांच्याशी मोबाइलवर बोलणे करून दिले. २७ जानेवारी २०१५ रोजी खालेद, परवेज आलम (रा. दिल्ली) हे औरंगाबादला आले. आरेफोद्दीन यांनी त्यांची हॉटेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्था करून जाहिरातींसंदर्भात चर्चा केली. तेव्हा त्या दोघांनी त्यांना मुंबईला जावे लागेल, असे सांगितले. खालेद, परवेज, सादिक मौलाना हे मुंबईला गेले. तेव्हा खालेदने त्यांची तत्कालीन मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) कैसर खालेद यांच्यासह चित्रपट निर्माते मानसिंग दीप यांची भेट घालून दिली. काही कंपन्यांमध्ये, राजकीय, माध्यम क्षेत्रातील लोकांच्या भेटी घालून त्यांचा विश्वास संपादन केला. यादरम्यान त्यांनी आरेफोद्दीन यांना हज कमिटीच्या चेअरमनपदाचे आमिष दाखवले. त्यासाठी ३३ लाख रुपये खर्च करावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार आरेफोद्दीन यांनी टप्प्याटप्प्याने पैसे दिले. परंतु तीन वर्षे झाल्यानंतरही तिघांनी ना पद मिळवून दिले ना पैसे. त्यानंतर संपर्क बंद केल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर, दत्तू गायकवाड यांनी चौकशी करून आरेफोद्दीन यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलिस निरीक्षक सातोदकर करत आहेत. 


मुंबई भेटीनंतर शहरात येऊन २३ लाख घेतले 
मुंबईत हॉटेलमध्ये आमिष दाखवल्यानंतर आरोपी दिल्लीला तर आरेफोद्दीन शहरात आले. नंतर परवेजने फोन करून तुमची निवड जवळपास नक्की झाली असून भेटायला येत असल्याचे सांगितले. जयसिंगपुऱ्यात एका शाळेजवळ त्यांनी परवेजला २३ लाख रुपये दिले व उर्वरित ऑर्डर मिळाल्यानंतर देण्याचे ठरले. २२ मे २०१५ रोजी त्याने खालेद यांच्याकडे १५ लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार आरेफोद्दीन यांनी मुलगा अब्दुल कदीर याच्या हस्ते दिल्लीच्या पत्त्यावर १० लाख रुपये पाठवून दिले. 

बातम्या आणखी आहेत...