आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक टक्का व्याजाने ५० हजारांचे अामिष दाखवून; बचतगटांच्या महिलांची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडको, सातपूर भागात कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. कमी व्याजदराने कर्ज मिळत असल्याचे सांगितल्यानंतर महिलांकडून डोळे झाकून या भामट्यांवर विश्वास ठेवला जात आहे. याचा गैरफायदा घेत लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. धड कर्जही मिळत नाही आणि कर्जाच्या आमिषाने दिलेली रक्कमही मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका बसल्याचे उघड झाले आहे. नुकताच शहरात बचतगटांना ५० हजारांचे कर्ज देण्याचे अामिष दाखवून लाखोची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

 

कोणत्याही बँकातून कर्ज काढायचे असेल तर त्यासाठी चार चे पाच प्रकारच्या दाखल्यांसह जामीनदार, तारण अशा कागदपत्रांची पूर्तता कर्जदारांना करावी लागते. यामुळे कर्जदारांचे चांगलेच हाल होतात. कर्ज काढण्यासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करता करताच कर्जदार हैराण होऊन जातात. त्यात अनेक बँकांमध्ये कर्जप्रकरण मंजूर करून देण्यासाठी एजंटचादेखील आधार घ्यावा लागतो. यामुळे सध्या झोपडपट्टी परिसरात जाऊन त्या ठिकाणी बचतगटाची स्थापना करून त्यांना कर्जाचे वाटप करण्याचे प्रकार सुरू आहे. कर्जप्रकरण तयार करण्यासाठी एका गटाकडून दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत परिसरात येणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून घेतले जातात. तसेच एकदा कर्ज काढले आणि त्याची परतफेड चांगली केल्यानंतर आणखी मोठ्या रकमेचे कर्ज आपणास मिळणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी आणखी खर्च सांगितला जातो. विशेष म्हणजे, हे कर्ज केवळ महिलांनाच दिले जात असल्याची अट टाकली जाते. झोपडपट्टी भागातील अल्पशिक्षित महिलांकडून कर्जप्रकरण तयार करण्याच्या नावाखाली विविध प्रकारचे शुल्क वसूल करत महिलांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

 

मध्य प्रदेश, गुजरातमधील टोळी 

नुकताच शहरात घडलेल्या महिला बचतगटांच्या फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी इंदूर येथे पळून गेलेल्या दोघा संशयितांना पकडून शहरात आणले. आरोपींनी इंदूर, गुजरात व अहमदनगर येथेही अशाच प्रकारे महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारदेखील यावेळी उघडकीस आला. तसेच शहरात फायनान्स कंपनीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेश आणि गुजरातच्या टोळीचा सहभाग असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 

सामाजिक कार्यकर्तेही बनतात एजंट 

शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडको, भारतनगर, वडाळागावासह सातपूर भागातील अनेक ठिकाणी सध्या कर्जप्रकरण मंजूर करून देण्याच्या नावाखाली तसेच कमी व्याजदराने कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून तसेच विविध शुल्काच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार आहे. या फसवणूक करणाऱ्या बोगस फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडूनच प्रवेश दिला जात असल्याची धक्कादायक बाब  समोर आली आहे.

 

बचतगटांना केले जातेय लक्ष्य 

महिला बचतगटांना महिला बँकेसह जिल्हा बँकेकडूनही कर्ज दिले जाते. बँकांपेक्षा कमी व्याजदराचे आमिष दाखवून काही बोगस फायनान्स कंपन्यांकडून बचतगटांची फसवणूक केली जाते. कमी व्याजदराचे कर्ज हवे असेल तर अनामत रक्कम ठेवण्याची अट घातली जाते. १५ ते २० हजारांच्या अनामत रकमेपोटी २ ते ३ लाखांचे कर्ज मिळणार, असे सांगून अशिक्षित महिलांकडून पैसे घेतले जातात. दहा किंवा पंधरा महिलांचा गट तयार करा, आम्ही कर्ज देऊ असे सांगितले जाते. मोबाइल, गृहाेपयोगी साहित्यांसह महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे तसेच कमी किमतीत देण्याचेही अामिष दाखवले जाते. त्यावर शहरातील महिला विश्वास ठेवून पैसे देण्यास तयार होतात अाणि पुढे फसवणूक हाेते. 


महिलांनी तक्रार द्यावी... 
शहरातील कोणत्याही भागात विविध अामिषांच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जात असल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात दिल्यास अशा संबंधितांवर कारवाई केली जाईल. मुंबईनाका पोलिस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरापींना अटकही केली आहे. महिलांनी ही सतर्कता बाळगून अशा कुठल्याही अामिषाला बळी पडू नये. - विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा)

 

एक टक्का व्याजाने ५० हजारांच्या कर्जाचे आमिष दाखवत फसवणूक 

एक टक्का व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत बचतगटातील महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकार नुकतेच समाेर आले आहे. या प्रकरणातील दोघा आरोपींना नुकतीच पोलिसांनी अटक केले. मुंबईनाका परिसरातील सुचेतानगर येथे सावरिया मायक्रो फायनान्स कंपनी थाटून बचतगटातील अनेक महिलांशी संपर्क साधला. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अवघ्या एक टक्का व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज प्रत्येक महिलेला वाटप करण्याचे दोघांनी भासवले. यानंतर महिलांकडून दीडशे रुपये फॉर्म फी आणि विमा, एक हप्ता आणि फाइल चार्ज या नावाखाली दोन हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही कर्ज दिले नाही. हजारो महिलांनी पैसे भरले. लाखो रुपये जमा होताच संशयित शहर सोडून फरार झाले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रारदार देण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...