आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायतनगर डाक खात्यातील अफरातफर प्रकरणी गुन्हा दाखल, अटकेसाठी पथक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- डाक कार्यालयातील हेराफेरी प्रकरणात अधीक्षक एस.बी.लिंगायत यांच्या उपस्थितीत विश्वनाथ पदमे यांनी गुरुवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीनंतर हिमायतनगर पोलिस ठाण्यात ३२ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाच्या रकमेची हेराफेरी केल्याच्या आरोपावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

 

हिमायतनगर शहरासह तालुका पातळीवरील पोस्ट ऑफिसचा कारभार भोकर येथील उप डाक कार्यालयाच्या देखरेखीखाली चालतो. याअंतर्गत ग्रामीण भागातील सरसम बु. येथील साहाय्यक पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत असलेले बाबाराव गणेश चव्हाण हा संगणकीय कारभारासह इतर कामकाजात तरबेज असल्याने हिमायतनगर येथील भारतीय उप डाक कार्यालयाचे तत्कालीन मुख्य पोस्ट मास्टर शे.मेहबूब यांनी त्यास हिमायतनगर येथे बोलावून घेतले होते. दरम्यान मागील काळात साहाय्यक पोस्ट मास्तर बाबाराव चव्हाण आणि पोस्ट मास्तर शेख मेहबूब यांनी संगनमताने हिमायतनगर शहरातील विठ्ठल बाबा कोमावार या खातेदाराच्या नावे तक्रारदाराकडे असलेल्या बचत खाते क्रमांक ५५७२५४१६९१ मधील आणि फिर्यादीने पोलिस डायरीमध्ये दिलेले खाते क्रमांक एस.बी. ५५७२५४३०४१ या खात्यामधून ०४ लक्ष ३१ हजार ३३ रुपयांपैकी ४ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाची रक्कम परस्पर बनावट स्वाक्षऱ्या करून उचलली. हा सर्व प्रकार बाबाराव चव्हाण याने आपल्याच काही नातेवाइक सीमा हनुमंत मोरे, गणेश बी चव्हाण, शोभाबाई गणेश चव्हाण आणि स्वतःच्या नवे असलेल्या खात्यात परस्पर ५ लक्ष, ४ लक्ष, ९.५ लक्ष ,९.५ लक्ष असे एकूण ४ खातेदारांच्या खात्यात २८ लक्ष रुपये ऑनलाइन वळते केल्याची नोंद घेऊन रक्कम जमा केली नाही. यामुळे प्रत्यक्षात वरील दोघांनी संगनमताने शासन व खातेदार यांच्या ३२ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाच्या रकमेची हेराफेरी करून अपहार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीनंतर हिमायतनगर पोलिसांत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

 

शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा 
या संदर्भात पोलिस निरीक्षकांशी संपर्क केला असता ते म्हणाले की या प्रकरणी डाक विभागाचे चौकशी अधिकारी विश्वनाथ नागोराव पदमे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्राहक व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अपहाराच्या रकमेची रिकव्हरीही दाखवली 
या अपहाराबाबतचे वृत्त दिव्य मराठीमध्ये झळकताच नातेवाइकांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्स्फर केलेली रक्कम पूर्वस्थितीत वळवून अंदाजे २५ लाखाहून अधिकची रिकव्हरी केल्याचे दाखवण्यात आले. तरीही याबाबत डाक अधिकाऱ्यांनी कालपर्यंत पोलिसांत तक्रार दिली नव्हती. असे असले तरी प्रत्यक्षात आणखी किती लाखांचा अपहार झाला याची उकल आज गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि पुढील तपासानंतर समोर येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...