आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मापात पाप' करून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून ग्राहकांची सर्रास लूट उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अनेक राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, साबण, चहा, शाम्पू, बिस्किटे, वॉशिंग पावडर आदी अनेक वस्तूंच्या आवरणांवर छापलेली वजने व प्रत्यक्षातली वजने यात तफावत आढळून आली आहे. याविराेधात ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार करून कायदेशीर लढा उभारण्याची तयारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. 

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले, ग्राहक पेठ व ग्राहक पंचायतीने दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती व वजनाचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक कंपन्यांच्या वस्तूंच्या वजन व किमतीत लक्षणीय तफावत आढळून आली. कमी वजनाच्या तुलनेत जास्त वजनाची वस्तू दीडपट ते दुपटीने महाग दिसून आली. उदाहरणार्थ १०० ग्रॅम चहा ३० रुपयांना असेल तर १ किलो चहाची किंमत ३०० असायला हवी. त्याऐवजी ४३० रुपये किलो या वाढीव दराने विक्री होत आहे. लहान पॅकिंग असलेल्या वस्तूच्या वेष्टनाची छपाई, मजुरी, वेळ असा हिशेब केल्यास हा खर्च मोठ्या वस्तूच्या पॅकिंगच्या तुलनेत जास्त महाग होतो. मात्र, बाजारात उलटेच आढळते. कमी वजनाची वस्तू व अधिक वजनाच्या वस्तू्ची तुलना केल्यास किमतीमध्ये तिपटीहून अधिक तफावत दिसून येते. एखादी वस्तू ५ रुपयांना अडीचशे ग्रॅम असेल तर तिची एक किलोची किंमत २० रुपये अपेक्षित असते. मात्र ही किंमत ४० रुपये किलो असल्याचे दिसते. त्यामुळे एकावर एक वस्तू फ्री देऊनही कंपन्या फायद्यात तर ग्राहक नुकसानीत असे चित्र दिसते, असे त्यांनी स्पष्ट केले. एकच गुणवत्ता असलेल्या दोन वस्तूंची कमाल किंमत (मॅक्झिमम रिटेल प्राइस - एमआरपी) वेगवेगळी असणे हे 'एमआरपी'च्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आहे, असे पाठक म्हणाले. त्यामुळेच बड्या कंपन्यांच्या या लुटीविरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय, राज्य सरकारचा वैधमापन विभाग यांच्याकडे कायदेशीर लढा उभारण्याची तयारी ग्राहक पंचायतीने केली आहे. 

 

अधिकारी म्हणतात, 'हे अामच्या कक्षेत नाही' 
वजनाचे पॅक व किमतीत फरकेचा गुणवत्तेत फरक पडतो का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. फरक असल्यास जास्त वजनाच्या वस्तू स्वस्त असाव्यात, या संदर्भात ग्राहक संरक्षण समितीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर वजन माप अधिकाऱ्यांनी 'हे आमच्या कक्षेत येत नाही,' असे उत्तर दिले. एमआरपी किती छापावी, हा उत्पादकाचा प्रश्न असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. 

 

या वस्तूंच्या विक्रीत ६ ते २०० टक्क्यांची तफावत 
कोलगेट पामोलिव्ह, कोलगेट, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेसले, प्रॉक्टर अँड गॅम्बल, ब्रिटानिया, पारले, विप्रो, कॅपिटल फूड्स, मोडेल्झ इंडिया फूड्स प्रा. लि. या कंपन्यांच्या २९ उत्पादनांचे सर्वेक्षण ग्राहक पेठ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केले आहे. फेअर अँड लव्हली, पाँड्स पावडर, लक्स साबण, बोर्नव्हिटा, नेस कॅफे, ब्रुक बाँड चहा, एरियल वॉशिंग पावडर, सर्फ एक्सेल वॉशिंग पावडर, गुडडे बिस्कीट, कोलगेट पेस्ट, संतूर सँडल सोप, चिंग्ज शेजवान नूडल्स, विम बार, सर्फ बार, रिन बार आदी उत्पादनांचा यात समावेश आहे. या सर्व उत्पादनांच्या लहान पाकिटाचे वजन व किंमत आणि त्याच उत्पादनाच्या मोठ्या पाकिटाचे वजन व किंमत यात ६ ते २०० टक्क्यांपर्यंतची प्रचंड तफावत आढळून आली आहे. म्हणूनच सर्वसामान्य ग्राहकांची हाेणारी ही लूट थांबवण्यासाठी अाता ग्राहक पंचायत कायदेशीर लढा देणार अाहे. 

 

मॉलमध्ये 'सेल'च्या नावाखाली लूट 
'विविध कंपन्यांकडून मॉलमध्ये सेलच्या नावाखाली विविध योजना जाहीर होतात. त्यात बऱ्याचदा जास्त वजनाच्या वस्तूंवर एमआरपी वाढवून दिली जाते आणि मग त्यावर सूट दिली जाते. नागरिकही त्या वस्तू विकत घेतात, पण फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मोठे पॅक खरेदी करताना नागरिकांनी काळजी घ्यावी,' असे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...