रस्ते अपघातग्रस्तांना मोफत / रस्ते अपघातग्रस्तांना मोफत वैद्यकीय सेवा; हेल्मेट घातले नाही तर मिळणार नाही विम्याचा लाभ

योजना तत्काळ सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी

प्रतिनिधी

Dec 14,2018 08:58:00 AM IST
नाशिक- रस्ते अपघातात विमा योजना राबवण्यासाठी शासनाकडून गांभीर्याने विचार सुरु आहे. शासनाने सुरू केलेली बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना पुन्हा सुरू करण्याचा शासनाचा विचार अाहे. या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ आणि मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा मांडला. योजना तत्काळ सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
रस्ते अपघातात जखमींना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे असते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होतो. या बाबीची गांभीर्याने दखल घेत अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रस्ते अपघातांबाबत विधानपरिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी रस्ते अपघात विमा योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
तत्काळ मिळणार सेवा
अपघातस्थळापासून या योजनेशी जोडलेल्या जवळील खासगी रुग्णालयात स्थलांतर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या १०८ रुग्णवाहिकेचा शासकीय रुग्णवाहिकेचा अथवा खासगी रुग्णवाहिकेचा वापर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
विनाहेल्मेट असल्यास लाभ नाही
विनाहेल्मेट दुचाकीचालकाचा मृत्यू वा डोक्यास गंभीर दुखापत असल्यास, तसेच, दाखल गुन्ह्यात हेल्मेट घातले नसल्याची नोंद असल्यास संबंधित चालकाला विमा कंपनीकडून तत्काळ लाभ मिळणार नाही. रस्ते सुरक्षा समितीने हेल्मेटबाबची अट विमा कंपनीला कळवली अाहे.
नियमांचे पालन हीच सुरक्षेची हमी
या वैद्यकीय सेवांमध्ये ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी, न्युरो सर्जरी, नेत्रतज्ज्ञ, कान-नाक-घसा, ट्रामा या तज्ज्ञांचा समावेश अाहे. अपघातग्रस्तांना या योजनेंतर्गत मोफत उपचार दिले जाणार आहे. प्रति रुग्ण प्रति अपघात ३० हजार रुपयांपर्यंत खर्च या योजनेंतर्गत संबंधित रुग्णाला दिला जाईल. अपघातग्रस्त व्यक्तीस सेवा देण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.
वाहतूक नियमांचे पालन करणे हीच खरी सुरक्षेची हमी आहे. हेल्मेट वापरणे ही मजबुरी न समजता स्वत:सह आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापर करा. हेल्मेटसक्ती दंड वसुलीसाठी नाही, अापल्या सुरक्षेसाठी अाहे. - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

X
COMMENT