आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा, जलदूतांचा मोफत पाणीपुरवठा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद | दुष्काळामुळे गावखेड्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पण टँकर कधी येईल याचा नेम नाही. आले तरी फारतर ड्रमभरच पाणी मिळते. हाताला काम नसल्याने पाणी विकत घेणे परवडत नाही. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावागावात जलदूत अवतरले आहेत. माणुसकीचा दुष्काळ टाळत त्यांनी स्वत:च्या मालकीच्या बोअर आणि विहिरीतील पाणी ग्रामस्थांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. काही गावात तर ही मंडळी सर्व कामे सोडून दिवसभर पाणी वाटप करताना दिसत आहेत.


जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील देवगाव (कुळशी) हे ४००० लोकसंख्येचे गाव. या मुस्लिम बहूल  गावात ख्रिश्चन धर्मिंयांची ५० घरे आहेत. गावात मशीद आणि मंदिरासोबत एक चर्चही आहे.  या चर्चमध्ये यंदा जोरदार पाऊस व्हावा म्हणून प्रार्थनाही करण्यात आली.  खूप खूप पाऊस होऊ दे, दुष्काळ दूर कर, असा नवस ५० वर्षांच्या सुलका जाॅनसन जाधव यांनी प्रभू येशूकडे केला. दुष्काळाची परिस्थितीच आता असह्य झाली आहे. यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा, असे ग्रामस्थांना वाटतेय.


गावात वर्षभर ग्राम पंचायतीमार्फत पाणीपुरवठा होतो. पाइपलाइन टाकल्या असून नळांना पाणी येते. पण फारतर ४-५ हंडेच पाणी मिळते. यामुळे तशी वर्षभरच पाण्यासाठी भटकंती सुरू असते. गावात एकही हातपंप नाही. एका विहिरीचा त्यांना आधार असतो. ती आटल्याने पूूर्वी २ किलाेमीटर दूर एका शेतातील विहिरीवर पाण्यासाठी जावे लागायचे. पण दोन दानशूरांमुळे त्यांची पायपीट थांबली आहे.
दिवसभर मोफत पाणी : मुजीब आमीर पटेल यांचे शेत गावाला लागूनच आहे. १० वर्षांपूर्वी त्यांनी शेतीसाठी बोअर घेतले. त्यास चांगले पाणी लागले. शेती चांगली होऊ लागल्याने मग एक एक करत ४० बैल घेतले. बैल आणि शेतीसाठी बोअरचे पाणी पुरू लागले. पण उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी दमछाक पाहून हृदय कालवले. मग त्यांनी उन्हाळ्याचे ४ महिने विनामूल्य पाणी देण्याचे ठरवले. साधारणपणे मार्च ते जूनपर्यंत तेे गरजूंना पाणी वाटतात. सकाळी ६ वाजेपासून मुजीब आणि त्यांचे बंधू अजीम आमेर पटेल 
कामाला लागतात.


ग्रामस्थ हंडे घेऊन रांगा लावतात. पटेल कुटुंबीयांतील सदस्य काेणतीही तक्रार न करता रात्री ११ पर्यंत पाणी वाटतात. दुसऱ्यांना पाणी वाटत असताना स्वत:च्या घरातील पाणी ते गर्दी ओसरल्यानंतर भरतात.  घरातही २००० लिटरची टाकी आहे. एखाद्याला बोअरचे पाणी नाही मिळाले तर ते या टाकीतूनही घेऊन जातात. पटेल म्हणतात, आम्ही सर्व कामे सोडून पाणी वाटण्याचे काम करताे. 


पाणीपुरवठा योजना करतोय 
गावात आधी कोणत्याच सोयी सुविधा नव्हत्या. रस्त्यात गटारी वाहत असायच्या. पिण्याचे पाणी कधीच उपलब्ध नव्हते.   विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावात एकही हातपंप नाही. यामुळे निदान वेळेत टँकर येईल याची काळजी घेतोय.  दोन जणांमुळे ग्रामस्थांची सोय झाली आहे. - गफ्फार बेग सरदार बेग, सरपंच


हे नेक काम इमाने इतबारे करत आहोत
गावात दरवर्षीच दुष्काळ पडतो. पिण्यासाठीही पाणी नसते. अल्लाहच्या मेहरबानीने आमच्या बोअरला चांगले पाणी लागले आहे. गरजूंना पाणी देणे हे नेक काम आहे. अल्लाहने यासाठी आमची निवड केली . ते आम्ही इमाने इतबारे करतोय. -मुजीब आमीर पटेल


रमजानमध्ये दुवा मिळताहेत 
नळांना येणारे पाणी काहीच कामाचे नाही.   उन्हाळ्यात आलेल्या राेजांमुळे अंगात त्राण नाही. दूरवरून पाणी आणताना दमछाक होते.अशा परिस्थितीत पटेल आणि बेग कुटुंबियांनी सुरू केलेले पाण्याचे दान ग्रामस्थांना दिलासादायक आहे. त्यांना लोकांच्या दुवा मिळतायत. -शेख अबुतालेब रफीक, देवगाव