आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार निवारण कक्षात पती-पत्नीत फ्रीस्टाइल हाणामारी, पत्नी बेशुद्ध; अकोल्यातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला  - पती-पत्नीतील वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्यात समेटाची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून दोघांनाही नातेवाइकांसह ‘भरोसा सेल’(महिला तक्रार निवारण कक्ष) मध्ये शनिवारी बोलावण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे दोघेही पोहोचले. मात्र तेथेच पती-पत्नीत हाणामारी झाली. नंतर पत्नीच्या भावांनी जावयासह त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना पत्नी बेशुद्ध पडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोरच घडला. 

कारंजा लाड येथील पंकज मेतकर यांचा विवाह जुलै २०१९ मध्ये राजंदा येथील कविता गजानन पातोंड यांच्यासोबत झाला. मात्र लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू झाल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विवाहितेने बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात पतीकडून शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी ती तक्रार समेटासाठी अकोला येथील भरोसा सेलमध्ये वर्ग केली. त्यानुसार शनिवारी पती-पत्नी यांना त्यांच्या नातेवाइकांसह भरोसा सेलमधील पोलिसांनी बोलावले होते. ठरल्याप्रमाणे विवाहिता, तिचे दोन भाऊ आणि वडील अशी मंडळी तर पती, त्याचा लहान भाऊ व एक त्रयस्थ व्यक्ती हे समेटासाठी हजर झाले होते. 
 
त्यांच्यात बोलचाल सुरू असतानाच पती आणि पत्नीच्या परिवारामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हाणामारी झाली. दोन्ही गटांत हाणामारी झाल्यानंतर तेथे असलेली कागदपत्रे आणि खुर्च्याही अस्ताव्यस्त झाल्या. महिला तक्रार निवारण कक्षातील ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी मात्र हा किरकोळ वाद असल्याचे सांगितले. 
 

पोलिसांवर भरवसा ठेवून आलो आणि मार खाल्ला 
आम्हाला मुलीच्या नातेवाइकांकडून धोका आहे. त्यांनी येथे चक्क पोलिसांसमोरच आम्हाला मारहाण केली. पोलिस कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आलो, मात्र येथेच आम्हाला मारहाण झाली. कुणीही मध्ये पडले नाही. 
- पंकज मेटकर, पती

बातम्या आणखी आहेत...