आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईच्या विरोधात फ्रेन्च रेव्होल्युशन! 133 जण जखमी, 412 अटकेत; आणीबाणीच्या इशाऱ्यानंतर आता सरकारची चर्चेची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्समध्ये इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. शनिवार आणि रविवारी देखील संतप्त नागरिकांनी हिंसक आंदोलन सुरूच ठेवले. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यात झालेल्या संघर्षात 133 जण जखमी झाले. जखमींमध्ये 23 सुरक्षा जवानांचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणांत 412 जणांना अटक केली आहे. निदर्शकांनी सहा इमारती व डझनावर गाड्यांना आग लावली. पॅरिसमध्ये सुमारे 200 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. निदर्शकांनी चक्का जाम केला.


गृहमंत्र्यांनी लावला समाजकंटकांवर आरोप
पॅरिसमध्ये निदर्शकांनी डझनावर गाड्या व सहा इमारती पेटवून दिल्या. अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने करण्यात आली. त्यात गृहमंत्र्यांनी हे नागरिक नसून समाजकंटक असल्याचा दावा केला. गृहमंत्री क्रिस्टोप कॅस्टनर म्हणाले, 1500 समाजकंटक शांततापूर्ण आंदोलनात घुसले. त्यामुळे आंदोलन तीव्र झाले. त्यांनीच हिंसाचार घडवला आहे. आंदोलनात सुमारे 75 हजारांवर लोक सहभागी झाल्याचा दावा सरकारने केला. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आणीबाणी लागू केली जाऊ शकते. त्यावर सरकार विचार करत असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुरक्षा दलाची तातडीची बैठक बोलावली होती.


राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन चर्चेस तयार 
आंदोलकांचा हिंसाचार मुळीच सहन केला जाणार नाही. अधिकाऱ्यांवर हल्ला, लूटमार, पत्रकारांना धमक्या देणे इत्यादी गोष्टी करणे योग्य नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना अराजकता हवी आहे. ते विघातक घटक कोण आहेत, हे शोधून काढू. सरकार चर्चेचे स्वागत करते. विरोधकांचेही म्हणणे ऐकून घेऊ, असे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले.


16 दिवसांत 3.5 लाख नागरिक महागाईच्या विरोधात रस्त्यावर
फ्रान्समध्ये गेल्या 16 दिवसांपासून महागाईच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. पेट्रोल तसेच हायड्रोकार्बन कर वाढवण्यासही नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. 16 दिवसांत सुमारे साडेतीन लाख नागरिकांनी येलो वेस्टअंतर्गत निदर्शने करून भावना व्यक्त केल्या. 17 नोव्हेंबरच्या आंदोलनात लाखो सहभागी झाले होते. 378 जणांना अटक झाली होती.

बातम्या आणखी आहेत...