आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सखे, तू रस्त्यावर उतरलीस, अंधाराची पळता भुई थोडी केलीस!

2 वर्षांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

सखे, माहीत आहे, तू परवा काय केलंस? २२ डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. त्या दिवशी तू रस्त्यावर उतरशील, असं आवाहन आम्ही केलेलं. लोक म्हणाले, ती कसची बाहेर पडतेय! काही म्हणाले, रात्री तिला कोण सोडतंय! बोचरी थंडी तिला मानवेल का, अशीही चिंता काहींनी व्यक्त केली. अंधाराचा कोणी गैरफायदा घेतला तर, अशी भीती अनेकांनी बोलून दाखवली. एकूण काय, तर तू येणार नाहीस, यावर शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं. त्यात आम्ही ना काही मार्केटिंग केलेलं. ना जाहिराती, ना होर्डिंग. कुठे कुणावर ना सक्ती, ना कसलं टार्गेट! ना कोणी सेलिब्रिटी, ना कोणी नेता! नेत्यांच्या सभांना हल्ली लोक कसकसे जमवावे लागतात, ते सर्वज्ञात आहे. त्यापैकी काही नेत्यांनीच सांगितलं. 'ती' काही येणार नाही. दिवसाढवळ्या ती येत नाही. अंधाऱ्या रात्रीत कशी येईल? ना काही मागण्या, ना कोणाचा निषेध, फक्त वॉकसाठी ती कशाला येईल? मी मात्र मनापासून लिहिलं की तू यायला हवंस! तू नसती आली, तर बिघडलं काहीच नसतं. प्रश्न कोणाच्याही प्रतिष्ठेचा नव्हता. पण, तू नसतीस आली, तर त्यांची हिंमत मात्र वाढली असती. अंधाराची दहशत आणखी दसपट झाली असती. पण,


तू म्हणजे तू!
तू कोणाला जुमानत
ेस!

ही व्यवस्थाच नाकारत तू उतरलीस रस्त्यावर आणि तुझ्या या आवेशाने त्यांचे अवसानच गळाले. तू अशी आलीस रस्त्यावर की जसे काही अंधाराची दहशतच नाही. अशी मस्त दिसत होतीस तू त्या रात्री, की निराशेला जागाच नाही. जणू, रोजचा रस्ता आहे तुझा, अशी सहजपणे चालत होतीस आणि अंधारात दबा धरून बसलेले रातकिडे धूम ठोकत होते.


'हम तो मांगे आज़ादी'
असं तू एवढ्या सुस्पष्ट आवाजात म्हणालीस, की कैक तुरुंगांनाच सुरुंग लागले.
'मी कधी घरी जावं, हे सांगायचं नाही!'
'मी कोणाबरोबर बोलावं, हे सांगायचं नाही!'
'मला चारित्र्याचं सर्टिफिकेट मागायचं
नाही!'

असं तू अशा खणखणीत आवाजात म्हणालीस की, अनेक जण भेदरलेच. 'ते' मुळातच घाबरट. पण, आव स्त्रीदाक्षिण्याचा! मला काय म्हणाले माहीत आहे? मला म्हणाले, स्त्रियांशी बोलताना 'माता-भगिनी' असं म्हणावं. माय-माउली असं म्हणावं. हे 'सखे' म्हणणं शिष्टसंमत नाही. असभ्य आहे ते! मी काय सांगितलं ठाऊक आहे? मी म्हटलं, पुरुषांशी बोलताना मी असं कधी वापरत नाही. मग, महिलांनाच उद्देशून बोलताना, माय-माउली वगैरे उल्लेख कशासाठी? मग समजलं, हाच तर डाव आहे यांचा. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे,' असं म्हणायचं आणि तिला माणसांच्या राज्यातून हद्दपार करायचं. पुरुष अनंतकाळ पुरुषच असणार. त्याचा नराधमही होणार. पण, स्त्री मात्र अनंतकाळची माता म्हणे. आईचा वा बायकोचा मित्र ज्यांच्या पचनी पडत नाही, अशांना या संबोधनातला गोडवा काय कळावा! तो समजला तुलाच.

रात्र वाढत गेली आणि हजारो महिला रस्त्यावर दिसू लागल्या, तेव्हा यांची बोलतीच बंद झाली. आणि, या महिला आल्या होत्या, त्याही उत्स्फूर्तपणे. स्वतःहून. अनेक ठिकाणी तर 'दिव्य मराठी'ची आवृत्ती नाही. कोणी सहकारी नाही. तिथं महिलांनीच सांगितलं, आम्हाला अंधारावर चालून जायचंय. आणि, पुण्यासारख्या शहरात, नवी मुंबईत शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. तेच नांदेडमध्ये. अगदी देऊळगावराजामध्ये. अकोल्यात पोलिस परवानगी नाकारताहेत, असं फक्त समजण्याचा अवकाश, पोलिस अधिकाऱ्यांना गराडाच घातला या रातरागिणींनी. कशी परवानगी देत नाहीत, तेच बघतो, असं म्हणत महिलांनी परवानगी मिळवली आणि वॉकही केला. अमरावतीत तर एका महिन्याची ओली बाळंतीण आपल्या बाळासह आलेली. सत्तरी उलटलेल्या आजी रणचंडीच्या रूपात औरंगाबादेत आलेल्या. आम्ही म्हणालो, २२ डिसेंबरला, २२ शहरांत. पण, प्रत्यक्षात ३६ ठिकाणी निघाले नाइट वॉक. एक लाखाहून अधिक रातरागिणी उतरल्या रस्त्यावर.

ही तुझी जादू.

तुझ्यात ही ऊर्जा येते कुठून? व्यवस्थेनं एवढं दडपलं असतं, तर अन्य कोणी संपून गेला असता. तू मात्र अधिकच धीरोदात्त होत गेलीस. आता तुला समजून चुकलंय… लहानपणी आईवरून शिवी देणाऱ्या भावाला वेळीच कानाखाली वाजवली असती, तर त्याचं हे असं झालं नसतं. 'तुला काडीची अक्कल नाही', असं चार-चौघात बोलणाऱ्या नवऱ्याला तेव्हाच सुनावलं असतं, तर पुढं ही वेळ आली नसती. 'तुला आज गाडीवर कोणी सोडलं? त्याचा काय संबंधंय तुझ्याशी?' असं शेजारच्या चौकशाखोर आजीनं विचारल्यावर, तेव्हाच तिला चूप केलं असतं, तर पुढं तिची हिंमत वाढली नसती. आपण चूप बसलो. सोसत गेलो. निमूटपणे सातच्या आत घरी परतत आलो. त्यामुळं यांनी गृहीतच धरलं आपल्याला. ऐकते म्हटलं की ऐकवायचं आणि चूप बसते म्हटलं की चूप करायचं, हेच केलं सगळ्यांनी.

आता खूप झालं.

भय मिसळलेल्या या हवेत कोवळ्या कळ्या अकाली मान टाकत आहेत. हे गांभीर्य तुला समजलं. म्हणूनच तर रस्त्यावर उतरलीस तू. गाऊ लागलीस, घोषणा देऊ लागलीस, नाटक बघू लागलीस आणि रात्र गर्द होत असतानाही ठाण मांडून राहिलीस. तुझं ते रूपच भारी होतं. नाशिकच्या रातरागिणींना ना थंडी अडवू शकली, ना औरंगाबादच्या तेजस्विनींच्या मनात पावसाच्या शंकेची पाल चुकचुकली. सोलापूर- जळगावमधील उत्साह अनपेक्षित होता. तेच यवतमाळचंही. 'मी म्हणजे शरीर नाही. मी माणूस आहे', असं म्हणत महिला रस्त्यावर उतरतात आणि अंधारावर चालून जातात, तेव्हा काय घडू शकतं, याचा महाराष्ट्र साक्षीदार आहे.

सखे, तू आलीस म्हणून मी 'थँक्यू' म्हटलेलं तुला आवडणार नाही. पण, आवाहन एवढंच. आता थांबू नकोस. हा एका दिवसाचा इव्हेंट ठरू देऊ नकोस. ही सुरुवात आहे एका नव्या सुरुवातीची. हीच आहे आशा अभ्युदयाची. हा संग्राम तू सुरू केला आहेस आणि तूच तो जिंकणार आहेस. आम्ही सोबत आहोत. सो, भेटत राहू. बोलत जाऊ. या संग्रामाची व्यूहरचना ठरवत राहू. आता लढायचं, हे ठरलं आहेच.

आणि, तू उतरतेस रस्त्यावर, तेव्हा अंधार कसा धूम ठोकतो, याचा ताजा पुरावा तुझ्याकडं आहे. खरं ना?
 

संजय आवटे, राज्य संपादक sanjay.awate@dbcorp.in
 

बातम्या आणखी आहेत...