आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती होऊ नये ही मित्रपक्षांची इच्छा! जास्त जागा न मिळण्याची भीती; सेनेच्या जागांवर छाेट्या मित्रपक्षांचा डोळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक अडसूळ 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत युती व्हावी अशी भाजप, शिवसेना नेत्यांची मोठी मनिषा आहे. याचा निर्णय आठवडभरात होणार असला तरी युतीचे घटक पक्ष मात्र २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळीसुद्धा युती होऊ नये, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. २०१४ च्या विधानसभेला शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले होते.  भाजपबरोबर रिपाइं, रासप, स्वाभिमानी आणि शिवसंग्राम असे ४ मित्रपक्ष होते. यावेळी स्वाभिमानी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे गेला आहे. त्याची जागा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.
 

भाजप कमळासाठीच आग्रही
१  युतीकडून ज्या १८ जागा चार मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. त्यातील १० जागा कमळावर लढवण्यासाठी भाजप आग्रही आहे. 
२  मात्र निवडणूक आयोगाची स्वतंत्र चिन्ह मिळण्याची अट पूर्ण करता यावी, यासाठी रासप, रिपाइं हे पक्ष भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार नाहीत.
 

आठवलेंच्या पक्षाला हव्या २६ जागा
रिपाइंने (आठवले गट) भाजपकडे तब्बल २६ मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यात चेंबूर, मानखुर्द, धारावी, पुणे काँन्टोमेंट, अंबरनाथ, उल्हासनगर, श्रीरामपूर, भुसावळ, बदनापूर, देवळाली, भंडारा, चंद्रपुर, पांढरकवडा, केज, उदगीर, गंगाखेड, पिंपरी, माळशिरस, फलटण यांचा समावेश आहे.
> आम्ही मागितलेले बहुसंख्य मतदारसंघ एससीसाठी राखीव आहेत. पैकी किमान १० जागा तरी हव्यातच. मागच्या वेळप्रमाणे रिपाइं स्वचिन्हावर लढणार, असे  पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे म्हणाले.
 

रासपला हव्यात ५२ जागा
माण-खटाव, दौंड, भूम-परांडा, केज, कळमनुरी, पारनेर, श्रीरामपूर, घनसांगवी, जिंतूर, निफाड, नांदगाव, बागलाण, धुळे ग्रामीण, बाळापूर, फलटण, माळशिरस, करमाळ्यासह ५२ जागांवर रासपने दावा केला अाहे. रासपही कमळावर निवडणूक लढण्यास तयार नाही.
> रासपने मागितलेले सर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचे आहेत. ते धनगर बहुल असे आहेत. यातील १२ जागांसाठी आमचा आग्रह आहे,  असे रासपचे नेते बाळासाहेब दोडतोले यांनी सांगितले.
 

स्वाभिमानीची पाेकळी सदाभाऊ खोतांच्या ‘रयत’ संघटनेने भरली
भाजपने २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १७ जागा दिल्या होत्या. त्यातील १३ जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढवल्या. यावेळी स्वाभिमानी संघटनेची महायुतीमधली पाेकळी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने भरुन काढली आहे. रयत क्रांती संघटनेला एक जागा आणि आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेला एक अशा जागा दिल्या जाऊ शकतात. एकूण, युतीविषयी जितका धसका भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला नाही, इतका धसका घटक पक्षांनी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...