आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राचा झाला अपघात, रक्त मिळवताना आल्या अडचणी; शिवशंभू ट्रस्ट स्थापन करत राज्यात जोडले 4700 रक्तदाते

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी 25 डिसेंबर रोजी कुंबेफळ येथील युवतीसाठी रक्तदान केले. - Divya Marathi
शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी 25 डिसेंबर रोजी कुंबेफळ येथील युवतीसाठी रक्तदान केले.

बीड : निमगाव केतकी (इंदापूर, जि.पुणे) येथील युवक भूषण सुर्वे. भूषण यांच्या एका मित्राचा बारामती येथे अपघात झाला. उपचारादरम्यान रक्ताची आवश्यकता भासली. मात्र, ऐनवेळी रक्त मिळवताना अनेक अडचणी आल्या. महत्प्रयासाने रक्त उपलब्ध झाले. असा प्रसंग इतरांवर येऊ नये, यासाठी भूषण यांनी 'शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट' स्थापन करत रक्तदानाचा महायज्ञ सुरू करत दीड वर्षात राज्यात ४७०० रक्तदाते जोडले आहेत.

दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भूषण यांनी सहकाऱ्यांच्या साथीने ३७ ठिकाणी शिबिर घेत रक्तदात्यांना जोडले आहे. आज ११ व्हॉट‌््सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे विविध गावांतील पदाधिकारी एकमेकांशी जोडले गेले आहेत. ग्रुपमध्ये रक्ताची मागणी असलेला संदेश आला की त्या ठिकाणी जो रक्तदाता जवळ आहे, तो जाऊन रक्तदान करतो. विशेष म्हणजे मोफत रक्त पुरवठा करण्यासाठी या ट्रस्टचा पुढाकार असतो. प्रवासाचा खर्च रक्तदाते स्वत: करतात. या चळवळीला युवकांच्या साथीने दिवसेंदिवस अधिक गती मिळत असून हा उपक्रम अनेकांशी 'रक्ताचे नाते' जोडणारा ठरत आहे.

अश्विनीचा जीव वाचवण्यासाठी दहा युवक सरसावले; जोडले रक्ताचे नाते

कुंबेफळ (ता.केज) येथील अश्विनी या रक्त व रक्तघटकांशी संबंधित 'हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम' या आजाराने त्रस्त असून बीड येथे एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना दररोज ७ रक्त पिशव्या लागत होत्या. दुसऱ्या बाजूला जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा. अशा स्थितीत शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष नितीन पवार व कार्याध्यक्ष लखन वीर यांच्या पुढाकारातून २० सदस्य २५ डिसेंबरला बीडला जमले. यातील दहा जणांनी रक्तदान करत या कुटुंबाशी रक्ताचे नाते जोडले.

एखाद्याचा जीव वाचवणे हे माैलिक कार्य

रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो ही भावनाच समाधान देणारी आहे. युवकांच्या साथीने आमचा ट्रस्ट रक्तदानाचा उपक्रम पुढे नेत आहे. अडचणींवरही मात करत आहोत. - भूषण सुर्वे, अध्यक्ष, शिवशंभू चॅ. ट्रस्ट.
 

बातम्या आणखी आहेत...