आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोस्तीही आणि कुस्तीही!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन मतदानाच्या तोंडावर आलेला दसरा यंदा जोरदार राजकीय मेळाव्यांनी दणाणला. भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेतही या मुहूर्तावर दिले गेले. बीड, नागपूर आणि मुंबई या राजकीय ‘शक्ति’पीठांवरून भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन केले. यावेळी लक्षणीय ठरला तो सावरगाव येथील पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा. सुरुवातीपासून ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा दावा करणाऱ्या पंकजा मुंडेंनी मध्यंतरी काही पावलं माघारी येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, तरीसुद्धा त्यांच्यामधील विसंवाद लपून राहिला नाही. त्यामुळे त्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांंच्याच संपर्कात असतात आणि त्याचेच चित्र काल पाहायला मिळाले. औरंगाबाद येथील नरेंद्र मोदींची सभाही पंकजांनीच हायजॅक केली होती. पंकजांच्या या महत्त्वाकांक्षेला नरेंद्र मोदी आणि अमित शहादेखील बळ देत असावेत, असे एक निरीक्षण यावेळी नोंद करण्यासारखे आहे. एकीकडे विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, राज पुरोहित, प्रकाश मेहता आदी मुख्यमंत्र्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना तिकिटे कापून बाजूला सारल गेलेे आहे.  त्याचवेळी पंकजांच्या दसरा मेळाव्यालाही तितकेच वजन प्राप्त करून देण्याचा प्रयत्न भाजपातून होताना दिसतोय. सावरगावात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमित शहांना ३७० तोफांची सलामी देत काश्मीर-३७० आणि अमित शहा हे समीकरण जनतेच्या मनावर बिंबवण्याचा तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीतही हा मुद्दा वापरून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही काश्मीर मुद्द्यावरून मोदी-शहा जोडगोळीची पाठ थोपटली. शिवाय, मॉब लिंचिंंगच्या घटना देश आणि हिंदू समाजाला जगात बदनाम करण्यासाठी घडवल्या जात असल्याचे सांगत संघ आणि भाजपचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दृष्टीने सोलापुरात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. उरलीसुरली काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास देशाला पवारांसारखे प्रबळ नेतृत्व मिळेल, अशी आशा शिंदेंनी व्यक्त केली. मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे शिवसैनिकांत अस्मितेचे स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. तरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला पहिला ठाकरे अर्थात आदित्य हेच यावेळच्या मेळाव्याचे आकर्षण होते.  भाजपाशी केलेली युती ही अपरिहार्यतेतून झालेली तडजोड आहे, असे मुलाखतीत सांगणाऱ्या उद्धव यांनी आपल्या भाषणातून भाजपला फटकावण्याची संधी मात्र सोडली नाही. सत्ता डोक्यात जाता कामा नये, असे सांगतानाच, ईडीच्या माध्यमातून सुडाचे राजकारण होणार असेल, तर महाराष्ट्र शांत बसणार नाही, अशा शब्दांत भाजपला जाता जाता इशारा केला. एकूणच यंदाच्या दसरा मेळाव्यांतून विचारांपेक्षा मतांचे सोने लुटण्याचाच प्रयत्न झाला. सत्तेच्या सुवर्णसिंहासनासाठी प्रसंगी सीमोल्लंघन करावे लागले, तर त्यासाठीचे शक्तिपरीक्षणही या निमित्ताने केले गेले.  

बातम्या आणखी आहेत...