आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षापासून पापरी शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांसोबत "मोती" श्वान निभावतोय मैत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी - प्राणी पक्ष्यासोबत मैत्री केली, त्यांना जीव लावला तर ते सुद्धा आपल्या सोबत मैत्री करतात. आपल्यालाही जीव लावतात. विद्यार्थ्यांना नेहमी शाळेत सांगितला जाणारा हा धड़ा पापरी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवयास मिळत आहे. आज मैत्री दिनानिमित्त अशीच एका श्वानाची मैत्री आम्ही तुम्हाला सांगत आहोत.


सन 2011-12 साली मोती लहान असताना त्यास मोठ्या इतर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जख्मी केले होते. तेव्हा शाळेतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी त्याच्यावर उपचार करून त्यास जीवदान दिले. तेव्हापासून मोतीची पापरी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत नाळ जोडल्या गेली. ती आज तागायत 8 वर्षे झाली टिकून आहे. मोती शाळा व परिसराचे रात्रंदिवस रक्षण करतो. शाळेत कवायत, परिपाठ सुरु असताना विद्यार्थ्यांच्या रांगेत फिरतो, शाळेत विद्यार्थ्यांसोबतच बसून भाकरी खातो. मैदानात इतर मोकाट कुत्र्यानाही फिरकू देत नाही. शाळेतील मुले मुली खेळताना अंगावर पडली तर चावाही घेत नाही. 

मागील आठ वर्षांपासून शाळेतच आहे मोती
या संदर्भात शिक्षक सीताराम गवळी यांनी सांगितले, शाळेतील विद्यार्थ्यांना सण 2012 साली मोती 3-4 महिन्यांचा असताना जख्मी अवस्थेत सापडला होता. मोठ्या कुत्र्यांनी चावा घेऊन त्यास जखमी  केले होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्याच्यावर हळद व इतर प्राथमिक उपचार केले होते. तेव्हापासून मोती आज तागायत 8 वर्षे शाळेतच आहे. कु्त्रा इमानदार प्राणी असल्याचे सांगितले जाते. त्याची प्रचिती पापरीच्या 'मोती'वरुन येत आहे.

लहान मुले श्वानासोबत खेळत बसतात
मोती शाळा परिसर सोडून कुठेही जात नाही. अनोळखी व्यक्ती शाळा परिसरात दिसली की त्याला  भुंकूंन हुस्कावुन घालवतो. माणसासोबतच तो इतर कुत्र्यांनाही शाळा परिसरात भटकू देत नाही. शाळेची जेवणाची सुट्टी झाल्यावरच तो विद्यार्थी शिक्षक यांच्या सोबत जेवायला बसतो. इतरवेळी विद्यार्थ्यांच्या अथवा शिक्षकांच्या डब्यात तोंड घालत नाही. शाळेचा एकूण विद्यार्थी पट सुमारे साडे सहाशेच्यावर आहे. सर्व विद्यार्थी मोती सोबत खेळत असतात. तो त्यांच्यावर भूंकत नाही. शाळेतील आवारात वावराताना लहान मुले खेळताना त्याच्या अंगावर पडली तर तो त्यांना चावत नाही. उलट लहान मुले व विद्यार्थी त्याच्यासोबत गळ्याला पायाला हात लावून खेळत बसलेली असतात.

रविवारी सुटी असल्यामुळे मोती अशाप्रकारे करतो आपल्या भोजनाची व्यवस्था
मोतीचे आणखी एक ख़ास वैशिष्ट्य म्हणजे तो दर शनिवारी आणि रविवारी स्वतःच्या जेवणाची सोय स्वतः करतो. रविवारी सुट्टी असल्याने शाळा बंद असते, त्यामुळे तो शनिवारीच विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाकरी कुठेतरी दडवतो अथवा मातीत वाळूत पुरतो आणि रविवारी त्याच्यावर आपली गुजरान करतो.

प्राणी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवतात 
हल्लीच्या स्वार्थी काळात माणसे इतकी प्रामाणिकपणे मैत्री निभावत नाहीत. परंतु 'मोती'सारखे प्राणी इमानदारीने आपल्यावर केलेल्या उपचाराची जाण ठेवत शाळेसोबत मैत्री जपत विद्यार्थ्यांना चांगला धड़ा देत आहे. - श्रीकांत ख़ताळ (मुख्याध्यापक )

मोती आमचा चांगला मित्र
मोती कुत्रा आमचा चांगला मित्र बनला असून त्यासोबत आम्ही दररोज खेळतो. त्याच्या हाता पायावर आमचा पाय पडला. आम्ही त्याच्या गळ्यात पडून बसलो तरी तो चावत नाही. आम्ही  जेवण करण्यास बसलो की तोही आमच्याजवळ येवून बसतो. मग आम्ही त्यास घरुन आणलेला खाऊ देतो. -  शाहरुख मुलाणी (विद्यार्थी)