आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशमुख-मुंडे, राजकारणातले विरोधक पण सख्खे मित्र, दोघांच्या मृत्यूबाबतही विलक्षण योगायोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विलासराव देशमुख यांचे नाव घेतल्यावर अनेकाच्या डोळ्यात आजही टचकन पाणी येतं. राजकारणापलीकडे मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत आणि राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी पाहायला मिळतात. दोघांनीही सामान्य कुटुंबातून येऊन राज्य व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. दोघेही लोकनेते होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली. 1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले.

 

मुंडे हे परळी तालुक्‍यातील असले तरी अनेक वर्षे लातूरचाच एक भाग असलेल्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. 1980 पासून विलासराव देशमुख हे लातूरमधून, तर गोपीनाथराव मुंडे हे रेणापूरमधून निवडून जायचे. राज्यानंतर दिल्लीच्या राजकारणातही दोघांनीही 2009 मध्ये एकदाच प्रवेश केला. 

 

दिवंगत देशमुख हे राज्यसभेवर गेले, तर दिवंगत मुंडे हे लोकसभेवर गेले. दिल्लीचे राजकारणही दोघांनी एकदाच सुरू केले. दोघेही ग्रामीण भागातून पुढे आल्याने त्यांना ग्रामीण विकासाची जाण होती. त्यामुळे केंद्रात गेल्यानंतर दिवंगत देशमुख यांना ग्रामीण विकास खात्याचा केंद्रीय मंत्री होता आले. 

 

ग्रामीण भागातील सक्षम नेतृत्व असल्याने पक्ष नेतृत्वाने दोघांच्या खांद्यावर ग्रामीण विकास खात्याचीच धुरा दिली हा एक योगायोग होता. या खात्याचाच कारभार करीत असतानाच दोघांचंही निधन झाले हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.


देशमुख हे काँग्रेसचे, तर मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते. दोघांची मैत्री असल्याने त्यांनी एकदाही एकमेकांना पाडायचा प्रयत्न केला नाही. उलट एखादा अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करीत मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचाच त्यांनी प्रयत्न केला. त्यांची ही मैत्री दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना खटकायची; पण दोघांनीही याची कधीच परवा केली नाही. उलट जाहीर कार्यक्रमातून राजकारणापलीकडे जाऊन आम्ही दोघे किती चांगले मित्र आहोत हेच ते सांगत राहिले. यालाही धाडस लागते हेही ते आवर्जून सांगत. 

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले की एकमेकांच्या फिरक्‍या घ्यायचे. गोपीनाथराव तुम्ही विरोधी बाकावरच छान दिसता असे सांगून विलासराव सर्वांनाच हसवायचे. तर विलासराव एक ना एक दिवस मीही सत्तेत असेन असे त्याला मुंडे प्रत्युत्तर द्यायचे. मुंडे हे युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा लातुरात देशमुख यांनी नागरी सत्कार करून राजकारणातही मैत्री कशी जपली जाते हे दाखवून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...