आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांनी सांगितले ‘शाहू’चे मेरिट ९८% वर क्लोज, ९४.२०% गुण असलेल्या अक्षयची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण - अत्यंत संयमात आणि उद्रेकाच्या माध्यमातून लाखोंचे मोर्चे, आंदोलन केलेल्या मराठा समाजाच्या हाती अजूनही निराशा, हतबलता आणि अपयशच दिसून येत आहे. देवळाली(ता.कळंब) येथील १६ वर्षीय अक्षय देवकर याच्या आत्महत्येतून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दहावीला ९४.२० टक्के गुण घेतलेल्या अक्षयला गुरुवारी त्याच्या लातूरमधील काही मित्रांनी शाहू कॉलेजचे मेरिट ९८ टक्क्यांवर क्लोज होतेय, असे सांगितले. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याने हतबल होऊन गळफास घेत जीवनयात्रा संपवली. या घटनेने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, सोशल मीडियावरून दिवसभर समाजाकडून संताप व्यक्त होत होता


गेल्यावर्षी एका शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांकडे स्पर्धा परीक्षेसाठी फी देण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली, त्या पिंपरी(शि.) गावापासून काही किलोमीटर अंतरावरील देवळाली येथील अतिशय हुशार व गुणवंत विद्यार्थी अक्षय शहाजी देवकर याने ९४.२० टक्के गुण घेऊनही आपला इयत्ता ११ वीसाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, या चिंतेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


आरक्षणाचा केवळ बनाव
दरम्यान, मराठा आरक्षणाचा बनाव असून एवढे मार्क घेऊनही काही फायदा झाला नाही. आमच्या मुलाचा बळी गेला, अशी उद्विग्न भावना अक्षयच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 


शाळेत पहिला नंबर
अक्षयचे प्राथमिक शिक्षण देवळाली येथेच झाले. अक्षयची अभ्यास करण्याची चिकाटी पाहून त्याच्या वडिलांनी परिस्थिती नसतानाही त्याला माध्यमिक शिक्षणासाठी लातूर येथे ठेवले. प्रत्येक वर्षी त्याचा पहीला क्रमांक येत असे. तो लातूर येथील साने गुरूजी विद्यालयात शिक्षण घेत होता. यावर्षी अक्षयने वर्षभर भरपूर अभ्यास केला व इयत्ता दहावीची परीक्षा दिली. निकाल जाहीर झाल्यापासून अक्षय निराश होता. तो सारखी घरी चर्चा करत होता. मला लातूरच्या शाहू काॅलेजमध्येच प्रवेश घ्यायचा असे तो सांगत होता.  परंतु टक्केवारी कमी पडली.  त्याचा स्वभाव लक्षात घेता त्याचे आई वडील अक्षयची समजूत घालत असत. गुरुवारी (दि.२०)अक्षयला लातूर येथील मित्रांचा फोन आला  होता.  मित्रांनी त्याला  ११ वी साठी किमान ९८ टक्के गुण लागतील. मित्रांशी चर्चा झाल्यानंतरच निराश झालेल्या अक्षयने घरी कोणीच नसताना आत्महत्या केली.


शेतीवर कर्ज घेण्याचा प्रस्तावही तयार होता
अक्षयचा इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या वडिलांनी पुढील शिक्षणासाठी मोठा खर्च येईल यासाठी तयारी सुरू केली होती. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, अशी अक्षयची इच्छा होती. त्याच्या इच्छेमुळे परिस्थिती नसतानाही वडील शहाजी देवकर यांनी शेतीवर कर्ज घेण्यासाठी प्रस्तावही तयार केला होता.
 

सोशल मीडियावर तीव्र स्वरूपाचा संताप  
अक्षय हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात आरक्षणाच्या भूमिकेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहेत. त्याच्या कुटुंबीयांची शुक्रवारी कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींनी भेट घेतली नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्याव्यतिरिक्त कुणीही नेता कुटुंबाला भेटला नाही.

 

मराठा आरक्षणाचे काय?
अक्षय हा आमच्या घरातील सर्वात हुशार मुलगा होता. त्याच्या उच्च व दर्जेदार शिक्षणासाठी आम्ही सर्वतोपरी तयारी ठेवली होती. वडिलांनी तर त्याच्या पुढील शिक्षणासाठी जमीन विकण्याचीही तयारी दाखवली होती. परंतु खचलेल्या अक्षयने आम्हा कुटुंबीयांना वेळच दिला नाही. मात्र, शासनाने वल्गना केलेल्या मराठा आरक्षणाचे काय झाले, अजून किती बळी जातील.
- श्रीकांत मुकुंंद देवकर, मृत अक्षयचा चुलत भाऊ.

बातम्या आणखी आहेत...