गणेशोत्सव / करमाळ्यात पंधरा वर्षांपासून मुस्लिम मित्राच्या हस्ते होते गणपतीची स्थापना; हिंदू-मुस्लीम भेदभावाला चपराक

रशीद यांना मोठे बंधु मानत त्यांच्याहस्ते गणपतीची स्थापना व विसर्जन करतो - गणेश केंडे 

Sep 03,2019 12:47:00 PM IST

करमाळा - दहा दिवसांच्या गणपतीचे वाजतगाजत स्वागत केले जाते. सर्व हिंदु समाज एकदिलाने तर काही ठिकाणी सार्वजनिक मंडळात मुस्लिम हिररीने भाग घेताना दिसत आहेत. पण शहरात एक आगळे वेगळे उदाहरण पहायला मिळत आहेत. केंडे कुटुंबात मागील पंधरा वर्षापासून गणेश केंडे यांचे जवळचे मित्र रशीद शेख यांच्या हस्ते गणरायाचे आगमन होते. यानंतर दहा दिवस नित्यनियमाने शेख कुटुंब आरतीला हजर राहत आहे.

आज काल हिंदु मुस्लिम असा भेट आपोआपच मिटत चाललेला बघायला मिळत आहे. हिंदुच्या सणात मुस्लिम तर मुस्लिमांच्या सणात हिंदू एकमेकांना सहकार्य करताना दिसत आहेत. करमाळ्यात देखील अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या सणांमध्ये हिंदू मंडळे सहकार्य करताना दिसतात. तर गणपती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीवेळी मशीदीवरुन फुलांचा वर्षाव केला जातो. तर अनेकदा गणपती स्थापनेला या मंडळामध्ये मुस्लिम अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पाहायला मिळतात. असे अनेक कुटुंब आहेत की ते दहा दिवस गणपतीची आरती न चुकता पूर्ण करतानाही दिसतात. पण मागील पंधरा वर्ष हा काळ म्हणावा तितका सोपा नव्हता. अशा परिस्थितीत ही रंभापुरा येथील रहिवासी गणेश केंडे हे आपला शेजारी मुस्लिम मित्र रशीद शेख यांच्या हस्ते न चुकता सालाबादप्रमाणे गणपतीची स्थापना आपल्या घरी कुटुंबासमवेत करत आहेत. विशेष म्हणजे रशीद शेख यांच्यासह त्यांच्या पत्नीही या कार्यात सहभागी होतात. त्याचप्रमाणे गणेश केंडे यांचे संपूर्ण कुटुंब रशीद शेख यांची दरवर्षी वाट पाहत असते. ज्या पद्धतीने हिंदू व्यक्ती गणपतीची स्थापना करताना रितीरिवाज पाळुन स्थापना करतो अगदी त्याच प्रमाणे रशीद शेख ही स्थापना करण्यासाठी काळजी घेतात. तर गणपतीची आरती ही शेख यांना तोंडपाठ असून संपूर्ण दहा दिवस केंडे कुटुंबासोबत शेख कुटुंब गणपती चे कार्यक्रम पार पाडतात.

रशीद यांना मोठे बंधु समजुन त्यांच्याहस्ते गणपतीची स्थापना व विसर्जन करतो
गणपती उत्सवात आपण सर्व आनंदी असुन एकसोबत येतो संपूर्ण कुटुंब दहा दिवस एकदिलाने एकत्र येते याकाळात मुस्लिमांच्या घरी अशा प्रकारचे कार्यक्रम होत नाहीत. मग अशा वेळी आपण त्यांना सोबत घ्यावे असे वाटले. तर मित्र म्हणुन जात भेद आम्ही कधीच माणत नाही मग उत्सवात तरी काय मानायचे. रशीद शेख वयाने मोठे आहेत. त्यांना आमचे मोठे बंधु समजुन आम्ही त्यांच्याहस्ते गणपती स्थापना व विसर्जन करतो.
- गणेश केंडे, रहिवासी करमाळा.

आम्ही सोबत वावरताना आमचा धर्म कधीच मध्ये आला नाही
गणेश आणि आम्ही एकाच भागात राहतो. आमच्या विभागात जास्त करुन हिंदु कुटुंब आहेत. त्यामुळे आमचा हिंदु कुटुंबांसोबत जास्त संपर्क आला आहे. गणपती बसवणे व दहा दिवस जपवणुक करणे हे लहानपणापासूनच करत आलो आहे. तर आम्ही सोबत वावरताना आमचा धर्म कधीच मध्ये आला नाही. गणेशचे कुटुंबीय मला आवर्जुन बोलवतात व माझ्याच हातून गणपती स्थापना करुन घेतात. पण हे सर्व करत असताना मुस्लिम म्हणुन नाही तर एक मोठा भाऊ किंवा मित्र म्हणुन करुन घेतात.
- रशीद शेख, करमाळा

X