आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली - हिंगोली शहरात येणाऱ्या गरजू भुकेल्या व्यक्तींच्या पोटाला अन्नपूर्णा योजनेचा आधार मिळणार असून मारवाडी युवा मंचच्या वतीने दहा रुपयांमध्ये सात्विक भोजन दिले जात आहे. या योजनेेच्या उद्घाटनाच्या दिवशी रविवारी (ता.१२) सुमारे दोनशे गरजूंना लाभ मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दररोज शेकडो गावकरी हिंगोली शहरात कामाच्या निमित्ताने येतात. अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शहरात आल्यानंतर भोजन करणेही कठीण होते. त्यामुळे उपाशी पोटीच गावी परतावे लागते. त्यामुळे गरजू भुकेल्या व्यक्तींना किमान एकवेळ सात्विक भोजन मिळावे या उद्देशाने मारवाडी युवा मंचतर्फे अन्नपूर्णा योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेमध्ये बसस्थानकावर थांबवलेल्या व्हॅनमधून दहा रुपयांमध्ये गरजूंना सात्विक भोजन दिले जाणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी आमदार विप्लव बाजोरिया यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, कमलसेठ बगडिया, कन्हैया खंडेलवाल, गोपाल अग्रवाल, नर्मदप्रसाद अग्रवाल, पंकज अग्रवाल, ओमप्रकाश हेडा, प्रकाशचंद सोनी, प्रमोद मुंदडा, अशोक शर्मा, राजू यादव, पवन उपाध्यय, दीपक सेठी, रुपेश जोशी, शैलेश लाहोटी, शुभम पारीख, राम परताणी, रुपम खंडेलवाल, संजय खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या योजनेमध्ये बसस्थानकावर सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत गरजूंना दहा रुपयांमध्ये भोजन दिले जाणार आहे. यामध्ये दोन चपाती, एक वाटी रस्साभाजी व शंभर ग्राम भात दिला जाणार आहे. दररोज किमान तीनशे व्यक्तींना या भोजनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेत आलेल्या प्रत्येकालाच सात्विक भोजनाचा लाभ दिला जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी सुमारे दोनशे व्यक्तींनी या योजनेचे लाभ घेतला आहे. मारवाडी युवा मंचाच्या पुढाकारातून सुरू झालेली अन्नपूर्णा योजना गरजूंच्या पोटाची आग शांत करणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांनी या योजनेचे कौतूक केले. या कार्यक्रमास मारवाडी युवा मंच मिटडाऊनच्या मीना झंवर, सुनीता खंडेलवाल, दीपा भक्कड, राखी झंवर, दीपिका उपाध्ये, सुनीला भंन्साळी, अर्चना खंडेलवाल, शारदा वर्मा, सविता अग्रवाल यांची उपस्थिती होती.
हिंगाेलीत अन्नपूर्णा योजनेचा गोरगरिबांना आधार
गरजूंना एकवेळ भोजन मिळणे गरजेचे
गरजू व्यक्तींना किमान एक वेळचे भोजन मिळणे गरजेचे आहे. अजमेर रेल्वे स्थानकावर राजस्थान सरकारकडून सुरू केलेल्या भोजन योजनेतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम हिंगोलीत सुरू केला आहे. बसस्थानकावरच गरजू व्यक्ती असतात. त्यामुळे ही योजना बसस्थानकावर सुरु केली आहे. त्यासाठी एक व्हॅन घेण्यात आली असून दररोज व्हॅनमधून भोजन पुरवठा केला जाणार आहे.
- पवन उपाध्याय, अध्यक्ष मारवाडी युवा मंच
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.