आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनिरुद्ध शर्मा
अयोध्या - प्रथमच अयोध्येत रामलल्लाची होळी वृंदावनाच्या बांके बिहारीने पाठवलेल्या गुलालाने होईल. नव्या परंपरेची रुजुवात करत बांके बिहारी मंदिराने रामलल्लाला गुलाल पाठवला आहे. सोमवारी रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी त्याचा स्वीकार केला. हरखून गेलेले दास म्हणाले, ‘आज ब्रजहून फक्त रंगच आला नाही, आनंद आणि उल्हासाची लाट आली आहे.’ मंगळवारी ज्या भाविकांना रामलल्लांच्या दर्शनाचे भाग्य लाभेल ते रामलल्ला आणि इतर तिन्ही भावांच्या गाल-मस्तकावरही गुलाल लावू शकतील.
आस्थेत रंगला पौराणिक संबंधांचा उजळ रंग
यापेक्षा मोठे सौभाग्य असेल की, तात्पुरत्या मंदिरात जाण्याआधी रामलल्ला बांके बिहारीच्या गुलालाने रंगतील. वृंदावनला अयोध्येत रंगमिलनाची प्रतीक्षा आहे.' - अशोककुमार गोस्वामी, सेवाधिकारी, श्री बांके बिहारी मंदिर.
अयोध्या व ब्रजचे हे नाते जगभरात रंगोत्सवाचा मान वाढवेल. ब्रजहून मिळालेल्या या विशेष भेटीने रामलल्ला आणखीच प्रफुल्लित होतील.'
- सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्रीराम जन्मभूमी, अयोध्या.
यंदा वृंदावनची ठंडाई आणि करंज्यांचा नैवेद्य दाखवणार
बांके बिहारी मंदिराने रामलल्लासाठी गुलालासोबत वृंदावनची खास ठंडाई आणि करंज्या पाठवल्या आहेत. रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, आजवर विशेष सोहळ्यांप्रसंगी रामलल्लाला वेलचीचा नैवेद्य दाखवला जात होता. यंदाच्या वेळी त्यांना वृंदावनहून आलेली ठंडाई आणि करंज्यांचा नैवेद्य दाखवला जाईल. जन्मभूमी परिसरात प्रथमच होळीनिमित्त आनंदाचे अद्भुत रंग दिसतील.
रामाचे बंधू शत्रुघ्न यांचे राज्य असलेल्या ब्रजचे अवधशी जुने नाते, आता बांके बिहारीने जोडली रंगांची नवी नाती
डॉ. धनंजय चोपडा
‘रसिया आयो तेरे द्वार, खबर दीजौ। यह रसिया पौरी में आयो, जाकी बांह पकर भीतर कीजौ...’ हे ब्रजचे गीत आज अवधमध्ये निनादत आहे. बांके बिहारीने रामलल्लाला गुलाल पाठवून अयोध्येच्या होळीच्या रंगात आपली आभा जोडली आहे. अनेक वर्षांनंतर होळीवर वेगळीच चमक पसरली आहे. शरयूच्या लाटांची गाज जरा जास्तच जाणवत आहे. जणू त्या गाताहेत, ‘ब्रज से आयो गुलाल अबीरा, अवध में होली खेलें रघुबीरा.’ प्रत्येक जण या रंगात रंगलाय.
शरयू अवध-ब्रजच्या प्राचीन संबंधांची साक्षीदार आहे. रामाचे धाकटे बंधू शत्रुघ्न यांनी ब्रजवर राज्य केले होते. ब्रज चौरासी कोस परिक्रमाचा विसावा एका गल्लीतील शत्रुघ्न मंदिरावर असतो. त्याला मोठे पौराणिक महत्त्व आहे. महोली गावातील कुंड शत्रुघ्न यांचीच कथा सांगतो. अयोध्येच्या कनक भवनचे नातेही त्याच रसिक समाजाशी आहे, जे ब्रजमध्ये राहून बांके बिहारीच्या रंगात रंगलेले असतात. हे नाते समजण्यासाठी आपल्याला जयदेव यांच्या ‘गीत-गोविंद’ पुस्तकाची उजळणी करावी लागेल. आज प्रथमच बांके बिहारीने गुलाल पाठवून ब्रज व अवधच्या नात्यागोत्यांची आठवण करून दिली तेव्हा अवघी अयोध्याच जणू साेबत गातेय.... ‘होली खेलें रघुरैया, अवध में बाजे बधैया।’
बांके बिहारी मंदिरात फुलांपासून निर्मित गुलाल ज्या पद्धतीने रंगछटांचा वर्षाव करेल ते अद्भुत तर असेलच, सोबत संस्कृती व परंपरेची शतकांपासून सुरू असलेली यात्रा अबाधित असल्याचा पुरावाही सादर करेल. आपण सर्व या अप्रतिम क्षणांचे साक्षी आहोत आणि संवाहकही. आशा ठेवा की, होळीच्या रंगांत न्हाऊन निघालेल्या सौहार्दाची आपली अयोध्या आपल्यासोबत चिरंतन कायम राहावी. यंदाच्या होळीची झळाळी जरा वेगळीच आहे. कारण, जन्मभूमीत लवकरच भव्य मंदिराची कोनशिला बसवली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.